Month: September 2026

राहुल पिंगळे यांच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा संवाद

ठाणे- काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांसाठी नाशिक येथे विशेष निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी…

गणेशभक्तांच्या गावाकडच्या प्रवासासाठी २९०० एसटी गाड्या सज्ज

‘सण-उत्सव हीच आपली संस्कृती, परंपरा पुढे नेऊया’-  एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला असून, तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगरसेवक राजेश मोरे, अनिल भोर, विभागप्रमुख अमित जयस्वाल, किरण नाकती आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, समाजाला एकत्र आणणारी आणि आपली संस्कृती व परंपरा जपणारी मोठी परंपरा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आजही त्याच परंपरेला पुढे नेत सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधन, विविध विषयांवरील देखावे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आनंद दिघे साहेबांनी गणेशोत्सव स्पर्धेला सुरुवात करून या उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिली, असे सांगत शिंदे यांनी ठाण्यातील गणेशोत्सवाच्या परंपरेचा उल्लेख केला. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे आपले सण-उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरे झाले पाहिजेत आणि पुढील पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला रेल्वे किंवा अन्य वाहतुकीचे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळानंतर सण-उत्सवांवरील निर्बंध हटवून नागरिकांना उत्साहाने आपले सण साजरे करता यावेत, यासाठी निर्णय घेतल्याचे सांगताना शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचाही आढावा घेतला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी समाधान देणारी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांशी आपले ‘लाडका भाऊ’ म्हणून नाते निर्माण झाले, याचा आनंद आणि समाधान असल्याचे ते म्हणाले.

रिंग मेट्रोबाधीतांचे आधी पुनर्वसन,मग प्रकल्प सुरू करा – परिषा सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील रिंग मेट्रोबाधीतांचे आधी पुनर्वसन करावे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिषा सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबरच निष्पाप नागरिकांना बेघर करून असहाय करू नका. अन्यथा, लोकमान्यनगरवासियांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही परिषा सरनाईक यांनी दिला आहे. महापालिका मुख्यालयात शुक्रवारी रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत सादरीकरण झाले. त्यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी विविध मुद्दे मांडले. त्याचबरोबर या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. रिंग मेट्रो प्रकल्पाला लोकमान्यनगर, वर्तकनगर, शिवाईनगरवासियांचा पाठिंबा आहे. मात्र, या भागातील नागरिकांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प राबवता कामा नये. मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना भाडे किंवा भाडेतत्त्वावरील घरे देणार असल्याचे सांगितले. पण ही घरे कुठं देणार ते स्पष्ट झाले नाही. लोकमान्यनगरसह १५०० ठाणेकरांची घरे उद्ध्वस्त करण्याऐवजी संपूर्ण रिंग मेट्रो भूमिगत पद्धतीने करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी आर्थिक वाटा उचलावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली. ठाणे शहराची ओळख ही तळ्यांचे ठाणे अशी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उड्डाणपूल व मेट्रोच्या पूलांमुळे शहराची ओळख पुलांचे ठाणे अशी होऊ नये. उड्डाणपूल व मेट्रोच्या खांबांच्या गर्दीत ठाणे शहर कुठंतरी हरविल्यासारखं वाटते. शहराच्या विकासाला विरोध नाही, मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या खांबांना विरोध आहे. वाहतूककोंडी मुक्त प्रवासासाठी उड्डाणपूल हवेत. पण भूमिगत मार्गांचाही प्राधान्याने विचार करावा. मुंबई मेट्रो ३ ही भूमिगत आहे. मात्र, रिंग मेट्रोत केवळ २ स्थानके भूमिगत ठेवण्यात आली आहेत, याकडे परिषा सरनाईक यांनी लक्ष वेधले. वर्तकनगर, रेमंड परिसराची लोकसंख्या सध्या २ लाखांपर्यंत आहे. या भागातील इमारतींचा पुनर्विकास व रेमंड संकुलातील नव्या इमारतींनंतर या भागाची लोकसंख्या ४ ते ५ लाखांवर झेपावेल. त्यामुळे रिंग मेट्रोच्या आराखड्यात वर्तकनगर व रेमंड परिसराचा समावेश करण्यासाठी कळवा-मुंब्रा डीपीआरच्या धर्तीवर नव्याने डीपीआर तयार करावा, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली आहे. उपवन तलावाच्या परिसरातून रिंग मेट्रो गेल्यानंतर तलाव व परिसराच्या नैसर्गिक सौदर्याला धोका पोचण्याची भीती आहे. ठाण्याचे ऑक्सिजन म्हणून उपवनची ओळख आहे. या प्रकल्पातून उपवन तलाव परिसराची हानी टाळावी. उपवन तलावाच्या समृद्ध परिसराचे जतन करावे, अशी सूचनाही परिषा सरनाईक यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव मेजर डॉ. नितिन राठोड ठामपाच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-१ पदी मेजर डॉ. नितिन राठोड (से.नि.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त-१ पदाचा पदभार स्वीकारला. महापालिकेत रुजू होण्यापूर्वी…

महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमास शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या विनाशुल्क पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात चेंबूर परिसरातील शालेय ६५ कॅरम खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी यांनी शालेय खेळाडूंना कॅरम सराव व कौशल्याबाबत तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी कॅरम विषयक प्रमुख नियमांबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नरसिंगराव यांनी शालेय कॅरम खेळाडूंना बसण्याची शास्त्रीय बैठक, स्ट्रायकर सोडण्यासाठी वापरली जाणारी बोटांची पकड, सोंगट्या घेतांना घ्यावी लागणारी दक्षता, सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचा सराव आदीबाबत चँम्पियन कॅरम बोर्डवर मार्गदर्शन केले. तसेच शालेय मुलांच्या खेळाविषयक शंकांचे निरसन देखील केले. याप्रसंगी कनिष्ठ पर्यवेक्षक रघुनाथ सोनवणे, क्रीडा शिक्षक डॉ.जितेंद्र लिंबकर, डॉ. भारती ढोकरट, जागृती पाटील, स्नेहल दौंड, अर्चना साबळे, चंद्रकांत करंगुटकर आदींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात होणार आहे.

 मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा

 केतकी थिटेला दुहेरी मुकूट मुंबई : बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगरच्या सहकार्याने आयोजित गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत (२०२६) अव्वल मानांकित केतकी थिटेने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. मायरा ओकवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत केतकीने अंतिम सामन्यात १५-१२, १५-१ असा विजय मिळवला. याआधी रविवारीच केतकीने महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यातही मायरा हिचा पराभव केला होता. १९ वर्षांखालील मुले गटाचे विजेतेपद प्रविथ साहूने जिंकले. अंतिम फेरीत त्याने ऋषभ गजवानीवर १६-१४, १५-५ अशी मात केली. अव्वल मानांकित हेझल जोशीने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखत १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेतेपद मिळवले. हेझलने फायनलमध्ये मायरा गोराडियाचा १५-१०, १५-७ असा पराभव केला. निकाल (सर्व अंतिम सामने) – १९ वर्षांखालील मुले: १-श्रीहान दुबे विजयी वि.२-आरव चितलांगिया १५-७, १५-६. ११ वर्षांखालील मुले: लक्ष्य गौर विजयी वि. २-अधृत सिंग १५-९, १५-९. ११ वर्षांखालील मुली: १-काव्या सरवणकुमार विजयी वि. काशी माहेश्वरी १२-१५, १५-१३, १५-१३. १३ वर्षांखालील मुले: २-अभिमन्यू शेटे विजयी वि. १-अजिंक्य देसाई १५-१०, १५-१३. १३ वर्षांखालील मुली: १-हेझल जोशी विजयी वि. मायरा गोराडिया १५-१०, १५-७. १५ वर्षांखालील मुले: प्रबीर चीमा विजयी वि. अजिंक्य देसाई ११-१५, १५-७, १५-११.

– प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या तनया जैनची नेत्रदीपक कामगिरी

१० मीटर एअर रायफलमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई मुंबई : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये विलेपार्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (CSMSS) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील (PTKS) प्रतिभावान नेमबाज तनया एन. जैन हिने आपल्या अचूक आणि दमदार नेमबाजीचे दर्शन घडवत १० मीटर एअर रायफल प्रकारात तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली. तनयाने या स्पर्धेत सीनियर, ज्युनिअर, युथ आणि सब-युथ अशा चारही गटांत अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने ४०० पैकी तब्बल ३९७ गुण मिळवत नेमबाजीतील आपली गुणवत्ता आणि सातत्य अधोरेखित केले. चार गट, चार विजय आणि चार सुवर्णपदके, अशी दैदिप्यमान कामगिरी करत तनया जैनने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तनयाच्या या उल्लेखनीय यशामागे तिचे प्रशिक्षक स्नेहल जितेश कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अचूक मार्गदर्शन, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि अविरत सराव तसेच PTKS अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे वेळोवेळी खेळाडूंना मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर तनयाची एकाग्रता, शिस्त, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे तिने हे यश संपादन केले. तनयाच्या या शानदार कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक, क्रीडा संकुलातील पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. नेमबाजीच्या क्षेत्रात तनया भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या लढ्याला डॉ. रविंद्र शेळकेंचा सकारात्मक सूर!

  काळ्याफिती लावून अलिबागेत मूक मोर्चा; उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांनी शासनदरबारी व्यथा पोहोचविण्याचे दिले आश्वासन अशोक गायकवाड अलिबाग : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनीच काळ्याफिती बांधून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने शनिवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूक मोर्चात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ. रविंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताना डॉ. रविंद्र शेळके यांनी आंदोलक शिक्षकांची भूमिका गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्यांची व्यथा शासनाच्या संबंधित स्तरापर्यंत निश्चितपणे पोहोचविण्याचे आश्वासन दिले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींना शुभेच्छा देतानाच, जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर शिक्षकांना निश्चितच यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या लढ्याला प्रशासनाकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा मानला जात आहे. ‘नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन द्या’ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेले कायम आस्थापनेवरील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी ३१ ऑक्टोबर २००५, १९ जुलै २०११ आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयांचा आधार घेतला आहे. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळी वागणूक देणे अन्यायकारक असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिक्षकांनी मांडली. अनिल बडेकर, शिवाजी वाघमोडे, राजेंद्र बोरसे, सुनील निकुंभ, चंद्रकांत गावंड, सुधीर शिंदे आदींनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दरम्यान, महिनाअखेरीस मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाला रायगडमधून मोठे पाठबळ देण्याचा निर्धार करण्यात आला. डॉ. शेळके यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे आता शासन या मागणीबाबत कोणती भूमिका घेते, याकडे रायगडातील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंची १९ पदकांची लयलूट !

 – उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा मुंबई : उपनगर जिल्हास्तरीय बॅडमिंटन सामने गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे २ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान संपन्न झाले. त्यामध्ये सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीच्या (SKBA) खेळाडूंनी  ११ सुवर्ण आणि ८ रौप्य मिळून  एकूण १९ पदके मिळविली !! मुंबई महानगरपालिकेच्या “शहाजीराजे क्रीडा संकुलात” मंगळवार ते शनिवार दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळात सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमी मध्ये विविध वयोगटातील मुलामुलींना बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंनी मिळविलेली पदके खालीलप्रमाणे: (1) सोहम  फाटक :- पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी  तिन्ही गटात मध्ये  सुवर्ण पदक  (2) मानसी कारेकर :- महिला दुहेरी  व  मिश्र दुहेरी मध्ये सुवर्ण पदक (3) प्रथीम मणीहर :- 17 वर्षा खालील एकेरी व दुहेरीत मध्ये सुवर्णपदक  (4) रिषभ  गजवाणी  19 वर्षाखालील दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक व एकेरी मध्ये  रौप्यपदक. (5)एक सुवर्ण एक रौप्य (6) अनिका तनेजा :-  17 वर्षी खालील दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक (7)प्रीत कौर:- 70+ मिश्र दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक  (8) सुश्रुत  करमरकर :- पुरुष दुहेरी मध्ये  सुवर्ण पदक  (9) श्वेता ठाकूर:-   महिला दुहेरी, 70+ मिश्र दुहेरी व 80+ मिश्र दुहेरी   तिन्ही गटात  रौप्य मुकुट पदक (10)नमिता  मेहता:- महिला दुहेरी  मध्ये रौप्य पदक  p(11)अयान कुलकर्णी:- 19 वर्षा खालील दुहेरी मध्ये  रौप्य पदक  (12) मायरा  गरोदीया :- 13 वर्षा खालील एकेरीत  रौप्य पदक (13)अद्रित सिंग  :- 17 वर्षा खालील एकेरी मध्ये रौप्य पदक अशी  एकूण 11 सुवर्ण पदके व 8 रौप्यपदके.  “सुश्रुत करमरकर बॅडमिंटन अकॅडमीने मिळवली आहेत””    तो स्वतः  राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचे खूप कौतुक होत आहे.

 शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना – बाळासाहेब माने

दापोली-पारगाव येथे मराठी भाषा संवर्धन व विकास आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उलवे : “मराठी ही आपली मातृभाषा आणि संस्कारांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या वैविध्यामुळे जगात मराठी माणूस चमकतोय. त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, पण त्यापेक्षा समाजात आपली गुणवत्ता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे. आजघडीला शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना बसतोय,” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने म्हणाले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, रायगड विभागाच्या वतीने मराठी विषयात विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व काव्य मैफल रविवारी रंगली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव येथे झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर तसेच दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा, शाखा वाशी, नवी मुंबईचे चेअरमन प्रा. किशोर पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार तथा उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या संजीवनी म्हात्रे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती आणि मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाचन संस्कृती जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट आणि महासंघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय महासंघ रायगडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. रेखा कटके यांनी कार्यक्रमामागील उद्देश व महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. किशोर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच मातृभाषेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला असलेले महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व समाजाने मातृभाषेच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. प्रा. संजय पाटील यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संजीवनी म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम व मराठी भाषा संमेलने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्येठ पत्रकार कृष्णा पाटील यांनीही मराठी भाषा, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता यावर आपले विचार मांडले.  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजक प्रा. रेखा कटके यांनी नमूद केले. यावेळी श्रीवर्धन येथील कार्याध्यक्ष प्रवीण कुमार पाटील, महाडवरून प्राची हाटे, प्रा. गव्हाण, प्रा. धनंजय भोसले, प्रा. शिरसाठ, प्रा. पठाण, प्रा. वडितके, एस. एस. खिराडे व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेळके कीर्तीदा यांनी केले, तर महासंघ जिल्हा सचिव प्राची हाटे यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि काव्य मैफलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.