अशोक गायकवाड
नवी मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या नामगजरात बेलापूर विभागामध्ये करावे येथील ज्ञानदीप विदयालयाच्या विदयार्थ्यांनी स्वच्छता दिंडीत मोठया संख्येने सहभागी होत स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश प्रसारीत केला. नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये विविध वयोगटातील नागरिक मोठया संख्येने सहभागी होत आहेत.
१७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून श्रीविठ्ठल भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी दिंडया – पताका नाचवत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. अशा वारीमय वातावरणात विदयार्थ्यांना वारीची परंपरा प्रत्यक्ष अनुभवता यावी व या माध्यमातून संत सज्जनांनी सांगितलेला स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारीत व्हावा यादृष्टीने ‘स्वच्छता दिंडी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये पाचशेहून अधिक शालेय विदयार्थी पारंपारिक वेशभूषा करुन उत्साहाने सहभागी झाले होते. यात विठ्ठल व रखुमाईच्या वेशभूषेतील विदयार्थी, संत ज्ञानेश्वर – संत तुकाराम अशा संतांच्या वेशातील विदयार्थी, छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ आणि मावळयांच्या वेशातील विदयार्थी हे या दिंडीचे आकर्षण होते. दिंडीत सहभागी विदयार्थी समुहांनी विविध जनजागृतीपर संदेश हे त्याविषयीचे फलक प्रदर्शित करीत व घोषणा देत प्रसारित केले. काही विदयार्थी समुहांनी ओलू – सुकू व घातकू चे फलक उंचावत कचरा वर्गीकरणाचा स्वच्छता संदेश प्रसारित केला. सध्या ‘सफाई हटाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान राष्ट्रीय स्तरावर राबविले जात असून या स्वच्छता दिंडीमध्ये आरोग्य रक्षणाचाही संदेश विदयार्थी समुहांनी तसे फलक उंचावून व घोषणा देत नागरिकांपर्यंत पोहचवला. काही विदयार्थी समुहांनी ‘वृक्ष लावा- वृक्ष जगवा’ असा संदेश वृक्षरोपे हातात घेऊन प्रसारित केला. वाचनाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या पुस्तके हातात घेऊन फलकांव्दारे वाचनजागृती करणा-या विदयार्थी समुहांची उपस्थितीही लक्षणीय होती. त्याचप्रमाणे संतांची छायाचित्रे असणारे फलक प्रदर्शित करीत महाराष्ट्राच्या संत परंपरेचाही दिंडीत जागर करण्यात आला. दिंडीत सहभागी ओलू, सुकू व घातकू या मॅस्कॉट्सची उपस्थितीही लक्षवेधी होती. करावे येथील ज्ञानदीप विदयालयाच्या पटांगणापासून सुरु झालेली स्वच्छता दिंडी ही ढोल – ताशे व बँडच्या गजरात नेक्सस सिवूड मॉलच्या दिशेने विविध घोषणा देत निघाली तेव्हा रस्त्याच्या दूतर्फा उभे राहून नागरिक या उपक्रमाचे कौतुक करीत होते. नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त शशिकांत तांडेल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीसारख्या आगळया वेगळया उपक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, कार्यकारी अभियंता संजय दादा पाटील, स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे आणि ज्ञानदीप सेवा मंडळ शाळेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी आणि शिक्षक, विदयार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. सुरुवातीला करावे येथे परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या शुभहस्ते स्वछता दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले व सामुहिक स्वच्छता शपथ ग्रहण करण्यात आली. तेथून पायी निघालेल्या स्वच्छता दिंडीची सांगता नेक्सस सिवूड मॉलच्या समोरील मोठया पॅसेजमध्ये करण्यात आली. येथे ज्याप्रमाणे वारीमध्ये पारंपारिक रिंगण घातले जाते, संतांचे अभंग गायले जातात, दिंडया – पताका नाचविल्या जातात, फुगडी व इतर खेळ खेळले जातात अशा कार्यक्रमांव्दारे माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेऊन स्वच्छता दिंडीचा समारोप करण्यात आला. ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर व त्यामध्ये व्यापक जनसहभाग घेण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत भर दिला जात आहे. याच धर्तीवर ‘स्वच्छता दिंडी’ हा अभिनव उपक्रम विदयार्थी, शिक्षक व नागरिकांच्या एकत्रित सहभागातून राबविण्यात आला असून या उपक्रमाला मोठया प्रमाणावर मिळालेला उत्साही प्रतिसाद नवी मुंबईकर नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरुकता सिध्द करणारा आहे. त्यामुळे सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी दररोज कचरा वर्गीकरण करुन, तो वेगवेगळा घंटागाडीत देऊन सहकार्य करावे तसेच विविध स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
