ठाणे : कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बिज. ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक रहात असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत. अशा या नैपुण्य दाखविणाऱया लोकांचा सत्कार / गौरव होणे गरजेचे आहे म्हणून आषाढी बिज कच्छी नवीन वर्षाचे औचित्य साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना सन २००६ साली केली. या मंचाचे हे १८वे वर्ष आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कच्छ पागडी कोणा शिरे? या शिर्षकाखाली सन २००६ पासून विविध स्तरावर नैपुण्य दाखविणाऱया व्यक्तीचा, तज्ज्ञांचा विविध राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जाते. तसेच कार्यक्रमाव्दारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढविण्याचे काम केले जाते.
सन २००६ पासून ते सन २०२३ पर्यंत अतिशय चांगल्याप्रकारे समाजसेवा करणाऱया, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱया, व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱया ८५ व्यक्तिंना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे गेली १७ वर्षे विविध क्षेत्रात नैपुण्य दाखविणाऱया कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे.
या वर्षी सुध्दा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम करणाऱया कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ जुलै २०२४ रोजी रात्री ९.३० वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित केला आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *