छत्रपती संभाजीनगर : आधी आमचे पक्ष फोडले आता लाडकी बहीण योजनेमुळे शिंदे सरकार आता महाराष्ट्रातील घरं फोडतायत अशी घणाघातील टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे.
जी योजना आणल्यामुळे सगळीकडे महिलांची गर्दी उसळलीय. चांगली गोष्ट आहे, पण त्यात घरामध्ये बहीण-भावामध्ये तुम्ही वितुष्ट आणताय. कारण, भाऊ बेकार फिरतोय, मुलीला मोफत शिक्षणाची सोय केली, मग मुलांनाही करा. दोघांमध्ये असा भेदभाव करू नका, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तुम्ही राजकारणात घरं फोडणारी माणसं आहात, आमचं घर फोडलं. पवारांचं कुटुंब फोडलं, पक्ष फोडला, आता जनतेचं कुटुंब तुम्ही फोडताय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकावर हल्लाबोल केला. बहीण-भावांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम तुम्ही करत असल्याचं ठाकरेंनी म्हटलं.
महिलांसाठी योजना आणली त्याचं मी स्वागत करतो, पण युवकांसाठी काय योजना आहे. आजही शेतकरी आत्महत्या करतात, त्या घरातील वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी योजना आहे, त्यामध्ये तो दिवा पेटू शकणार आहे का?. बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर फिरत आहेत, आणि तुम्ही महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत आहात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या योजनात्मक धोरणांवर टीका केली.
