० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी

० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर

० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये

स्वाती घोसाळकर

मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना नजर कैदेत ठेवले आहे. दोन वर्षापुर्वी गुवाहटी पलायनाचे नाट्य घडल्याने आता कोणताच पक्ष धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने मत फुटण्याचा धोका सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलविण्यात आला आहे. एकप्रकारे आमदार हे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या जणू कैदेतच असल्याचे आज चित्र पहावयास मिळाले. येत्या १२ जुलैरोजी मतदान होत असून शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना निवडणूकीत उतरवल्याने निवडणूकीत रंगत आली आहे. त्यामुळे नार्वेकर यांनी निवडून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि भाजपाचे सदाभाऊ खोत यांची जागा धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या सर्व १६ आमदारांना परेल येथील आयटीसी ग्रँड हॉटेल येथे बोलावलं आहे. याच हॉटेलमध्ये निवडणुकीच्या दिवसापर्यंत आमदारांचा मुक्काम असणार आहे.

 या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडून सर्व ९ उमेदवार जिंकून आणणार, असा दावादेखील केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीकडून ३ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. हे तीनही उमेदवार जिंकून येतील तितकं पुरेसं संख्याबळ महाविकास आघाडीकडे सध्याच्या घडीला आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी दगाफटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षाकडून काळजी घेतली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या सर्व १६ आमदारांची राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर केली जाणार आहे. आमदार आदित्य ठाकरे सर्व आमदारांसोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता आहे. आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. आमदार अनिल परब यांच्याकडून आज खास मेजवाणीचा बेत आखण्यात आला आहे. तर स्थानिक आमदार अजय चौधरींकडे घरगुती जेवणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना ताज लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिंदे गटाकडे ४७ आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदारांची मतदानाची प्रॅक्टिस होणार आहे.

भाजपाने आपल्या उमेदवारांना प्रेसिडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर अजित पवार यांनीही आज आपल्या दालनात सर्व आमदारांची महत्वाची बैठक घेऊन निवडणूकीचे नियोजन केले.

महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 274 आहे तर एकूण संख्याबळ 288 आहे. विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी 23 मतांची आवश्यकता असते. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 असे उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. युबीटीमधून शिवसेनेकडे 1 उमेदवार, काँग्रेसचा 1 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

  • भाजप- 103
  • काँग्रेस- 37
  • शिवसेना (ठाकरे)- 15
  • शिवसेना (शिंदे)- ३८
  • राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 12

छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत?

  • बहुजन विकास आघाडी- 3
  • समाजवादी पक्ष- 2
  • एमआयएम-2
  • प्रहार जनशक्ती पक्ष-2
  • मनसे-1
  • पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष – 1
  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)-1
  • शेतकरी पक्ष- 1
  • जनसुराज्य शक्ती- 1
  • अपक्ष- 13

विविध पक्षांकडून विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे

भाजपचे विधानपरिषद उमेदवार 

  1. पंकजा मुंडे
    2.परिणय फुके
    3. सदाभाऊ खोत
    4. अमित गोरखे
    5. योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

  1. शिवाजीराव गर्जे
    2.राजेश विटेकर

शिवसेना (शिंदे)

1.कृपाल तुमाने
2. भावना गवळी

शिवसेना – ठाकरे

  1. मिलिंद नार्वेकर

शेकाप – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार समर्थक उमेदवार

1.जयंत पाटील

काँग्रेस –

  1. प्रज्ञा सातव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *