कुटुंब नियोजनाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे-डॉ.अंबादास देवमाने
अशोक गायकवाड
रायगड :अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने,यांनी सांगितले.
कुटुंब नियोजन पद्धतीचा तसेच विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात ११ जुलै हा दिवस “जागतिक लोकसंख्या दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीम. रेश्मा संकपाळ, वैद्यकीय पर्यवेक्षक राजेंद्र भिसे, अधिसेविका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिसेविका श्रीम.अनिता भोपी, पी.एच.एन. नंदिनी चव्हाण, परिसेविका श्रीम.उषा वावरे, श्रीम.मोकल, सुविधा दवटे आदि उपस्थित होते.जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यामतून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत, त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले.
संयुक्त राष्ट्र संघाने १९८९ साली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. व पहिला लोकसंख्या दिन ११ जुलै १९९० रोजी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने सूचित केल्यानुसार नियोजित उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत असून २७ जून ते १० जुलै या दरम्यान “दांम्पत्य संपर्क पंधरवडा” साजरा करण्यात आला व ११ जुलै ते २४ जुलै दरम्यान “लोकसंख्या स्थिरता पंधरवडा” साजरा करण्यात येणार असल्याबाबत प्रास्ताविक करताना निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे यांनी सांगितले. तर प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन यांनी २०२४ च्या लोकसंख्या दिनाचे शीर्षक (थीम) “माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा” व घोषवाक्य “ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दांपत्याची” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. तसेच अतिरक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे या करिता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी अलिबाग शहरामध्ये जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले तर समारोप प्रसंगी श्रीम.सारिखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनीनी पथनाट्यातून जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केल तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका गावंड, काजल भोईर, कांचन खारकर, मयूर हांडे व निलेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
00000
