ठाणे : शाळेच्या बंदिस्त दुनियेतून कॉलेजच्या मुक्त दुनियेत प्रवेश करताना बदलत्या वातावरणात आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने न भीता पावले टाकली पाहिजेत, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी मुलांना समजाविले. समता विचार प्रसारक संस्थेच्या ‘कॉलेजची दुनिया’ या एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमानंतर झालेल्या पहिल्या पाठपुरावा शिबिरात ते बोलत होते. या वेळी ठाण्यातील विविध वस्त्यांतील ६८ एकलव्य विद्यार्थी उपस्थित होते. एकलव्य कार्यकर्ता अनुजा लोहार कार्यक्रमाच्या संयोजक होत्या. ते पुढे म्हणाले, कॉलेज मध्ये तुम्हाला अनेक आव्हाने असतील तशीच अनेक प्रलोभने असतील. अभ्यासा बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासाठी, कला गुण जोपासण्यासाठी अनेक उपक्रम असतील, अनेक दालने उघडली जातील, त्यांचा सकारात्मक विचाराने उपयोग करुन घ्या. तशीच मौज मजा करण्याचे अनेक मार्ग दिसतील. त्यांच्याबाबत सावध रहा. आई वडिल अत्यंत मेहनत करुन तुम्हाला शिक्षण देत आहेत, त्यांची मान खाली जाईल असे वागू नका. आजवर मातृभाषेतून शिक्षण होते. आता इंग्रजीचा सामना करावा लागेल. त्यासाठी रोज इंग्रजी वाचत चला. जमेल तसे इंग्रजीत बोलायला लागा. इंग्रजी शब्द संग्रह वाढवा.
संस्थेतर्फे भातलावणी, नाट्य प्रशिक्षण, शॅार्ट फिल्म मेकींग, चित्रकला अशी सत्र घेण्यात येणार असल्याचे सांगून यातही सामिल होण्याचे आवाहन त्यांनी केले. समता विचार प्रसारक संस्था एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या अनेक शिष्यवृत्त्या आणि योजना यांची माहिती देण्यासाठी ठाण्यात लवकरच एक केंद्र सुरू करणार आहे. त्या केंद्राचा फायदा करून घ्या, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले. संस्थेचे कायकर्ते अजय भोसले, निलेश दंत, सुनील दिवेकर, करीना साऊद, किसान सिंग बेदी आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
०००००
