संदीप चव्हाण
एकोणीतस वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीत अनेक संस्मरणीय प्रसंगाचे वार्तांकन केले. विजय-पराजयाच्या अश्रुने ओलेचिंब भिजलेले लेख लिहीले… पण अर्ध्यावरतील मोडलेल्या डावाची ही अधुरी कहाणी लिहायला मनच धजावत नाही… या कहाणीची सुरुवात कुठून करायची… आणि शेवट कसा करायचा… मन सुन्न झालंय. माझी जर ही अवस्था असेल तर ज्या विनेश फोगटचा ऑलिम्पिक फायनलचा डाव विस्कटला तिच्या मनाची स्थिती काय झाली असले. जेव्हा तुमचे अवघे आकाश तुमच्याकडून हिरावून घेतले जाते तेव्हा या धरणीने पोटात सामावून घ्यावे अशी भावना मनात येत नसेल का ?
पॅरिसमधिल काल संध्याकाळचा सुर्य मावळला तोच मुळी भारताच्या कुस्तीला एतिहासिक पहाट देण्याचे वचन देऊन. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिच्या ५० किलो वजनी गटाची फायनल गाठत मेडल नक्की केले होते. पहिल्या फेरीत टोकीयो ऑलिम्पिकमधिल गोल्ड मेडेलिस्ट युईचा विनेशने केलेला सनसनाटी पराभव मी कायम हृदयात साठवून ठेवला आहे. ३- २ असा विनेशने मिळविलेला विजय जादूई असाच होता. सुईवरील विजयानंतर फायनल गाठणे ही तीच्यासाठी फक्त औपचारिकता होती. आज सकाळी फक्त सहा मिनिटांचा खेळ होता आणि भारताचे पहिलेवहीले कुस्तीतील एतिहासिक गोल्ड मेडल नक्की होते. पण नियीती किती क्रुर असावी. काल रात्री तीचे निर्धारीत अशा ५० किलो वजनापेक्षा दिड किलो वजन जास्त होते. अख्खी रात्र तीने व्यायाम – सायकलिंग पासून अगदी केस कापण्यापर्यंत जे जे शक्य होते ते सारे काही केले. पण तरीही वजन जास्त भरलेच. परिणामी तीला स्पर्धेतून बाद करण्यात आले. तीने ज्या क्युबाच्या खेळाडूला सेमीफायनलला हरवले होते तीला फायनलला पुढे चाल देण्यात आली. आणि भारताचे एक हक्काचे मेडल मिळता मिळता राहीले.
विनेश फोगट रिओ आणि टोकीयो ऑलिम्पिकमध्येही खेळली होती. मी रिओला जेव्हा होतो त्यावेळी अचानक तीच्या दुखापतीची बातमी आली. आणि तीला माघार घ्यावी लागली. टोकीयोत तीला उपांत्यपुर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आणि यंदा सेमीफायनलला जाऊनही रिकाम्या हाताने तीला परतावे लागले.
विनेशला मी पहिल्यांदा पाहिले ते दक्षिण कोरियातील इंचेनमधिल आशियाई क्रीडा स्पर्धेत. ४८ किलो वजनी गटात तीने भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले होते. त्याचवेळी तीच्यातील चुणूक दिसून आली होती. त्यानंतर तीने ५३ किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले होते. एक ऑलिम्पिक सोडले तर जवळपास तिच्याकडे प्रत्येक स्पर्धेतील मेडल होते. आज स्वप्न साकार होता होता ते तुटले. डाव अर्ध्यावरती मोडला आणि ऑलिम्पिकची कहाणी अधूरीच राहीली.
तीच्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कुणाची? सपोर्ट स्टाफने इमाने एतबारे काम केले का ? प्रश्न अनेक आहेत. त्याची उत्तरे मिळतीलही कदाचित पण मिळणार नाही तो विजयाचा क्षण. ज्यासाठी हा देश आसुसलेला आहे…
विनेशला कदाचित आरोपीच्या पिंजऱ्यातही उभे केले जाईल. पण एक सांगतो. या परीने आपल्याला ऑलिम्पिक फायनलच्या दुनियेची अविस्मरणीय सफर घडवून आणलीय. काळ जर थांबविता आला असता तर त्या दुनीयेत अजुनही रहायला नक्की आवडले असते. पण स्वप्न तुटायेचेच होते. कहाणी अधुरी रहाण्यासाठी…
