सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत
पुणे : “राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा केला, आम्हाला मतदान झालं नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज टाकू. आताचं जे सरकार आहे ते तुमच्या आणि माझ्या सुख आणि दुःखाचं नाही. हे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला १५०० रुपयांची किंमत लावत आहात. बहिणींचं प्रेम कधीतरी बघा. ही बहीण फक्त १५०० रुपयांसाठी भावांवर प्रेम करत नाही, तर मनापासून प्रेम करते. भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह काय? सगळं देऊन टाकलं असतं”, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. तुळजापूर येथे शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सभा पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. ही बहीण फक्त १५०० रुपयांसाठी भावांवर प्रेम करत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्हाबाबतही एक विधान केलं. त्यामुळे ते अजित पवार यांनाच उद्देषून असल्याचे म्हटलं जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या आत्मपरीक्षणातून जात आहे. अशातच त्यांनी बारामती निवडणुकीबाबत पश्चाताप व्यक्त केला. पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवायला लावून चूक केल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीसोबत गेलेल्या अजित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. अजित पवार यांच्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं.
