सांगलीत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची घोषणा

सांगली : महाराष्ट्रातील बहीणींवर सगळ्याच राजकीय पक्षांना प्रेमाचे भरते आले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आज थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहि‍णींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी, बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजीत कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकल्याचं सांगत खर्गे यांनी मोदींवर टीका केली. तसेच, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला, ⁠राम मंदीराला हात लावला ते गळत आहे, गुजराच्या पुलाचं उद्घाटन केल तर तो पुल पडला, ⁠मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला, असे म्हणत पुतळा कोसळल्यावरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. ⁠ खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, ⁠त्यांच्या बाजून सर्व नकली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लक्षात ठेवा, ⁠खर स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि नेहरु यांच्या दुरदृष्टीने मिळालं होतं, असेही खर्गे यांनी म्हटलं.

मोदींनी राज्यातील प्रत्येकाची माफी मागावी- राहुल गांधी

 जो कोणी चुकीचं कृत्य करतो, तोच माफी मागतो. ज्यानं चुकीचं कृत्य केलेलं नाही तो माफी मागत नाही. मग मोदींनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या कारणांसाठी मागितली? अशी विचारणा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. माफी मागण्यामागे तीन कारणे असू शकतात. ते पुढे म्हणाले की, मूर्तीचं काम आरएसएसच्या माणसाला दिलं गेलं होतं ते द्यायला नको होतं. ते काम मेरिटवर द्यायला हवे होतं. दुसरं कारण एक असू शकतं ते म्हणजे मूर्तीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा चोरी झाली असेल त्यासाठी कदाचित मोदी यांनी माफी मागितली असावी. तिसरं कारण म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती केली पण ती मूर्ती उभी राहू शकली नाही. मात्र या ठिकाणी पतंगराव कदम यांची जी मूर्ती उभी केली गेली आहे ती तुम्ही 50-60 वर्षांनी जरी पाहिली तर ते तुम्हाला दिसेल. मात्र, शिवरायांच्या पुतळ्यामध्ये कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केल्यानेच मूर्ती कोसळल्याने मोदी यांनी माफी मागितली असावी, अशी तीन कारणे देत राहुल गांधी यांनी मोदींच्या माफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा यांनी अपमान यांनी केला असून महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची माफी यांनी मागितली पाहिजे, अशी राहुल गांधी यांनी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *