नागपुर : मी डॅाक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं. काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवून टाकले”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला. नागपूर येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
डॉक्टर संघटनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमाने यांचे तोंड भरून कौतुक केलं. तुमाने हा साधा माणूस, दोन वेळा खासदार होऊन दिल्लीत गेलेल्या तुमाने यांना मी यावेळी सांगितलं निवडणूक लढवायची नाही. ते तयार झाले. आता खासदारापेक्षा मोठा मान तुमाने यांना देणार आहे. असे शिंदे यांनी जाहीर केले.
कोरना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. जीवदान देणारं परमेश्वराचं रुप म्हणून डॅाक्टरांचे स्थान आहे. आपण ते अनुभवत असतो. मी येताना जुपीटर रुग्णालयात फोन केला. डॉक्टरांना फी कमी करायला सांगितली. रुग्णाचे काही पैसे आम्ही देतो. मलाही दोन वेळा कोविड झाला. त्यावेळेस मला सात रेमडीसेवीर देऊन टाकल्या, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवनदान देणारे परमेश्वराचे रुप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरुप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तर डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे, हे खिशातून पैसे देतील. कोविडमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टर देण्याच्या अगोदर पेशंटच म्हणायचा रेमेडेसिवीर द्या. मी कोरोना काळात खूप फिरलो. मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो, तेव्हा दुर्गम भागात गेलो. प्रत्येक ठिकाणी भेट दिली. तिथेही डॉक्टर लोक चांगलं काम करतात. ऑर्थोपिडिक सर्जन खूप आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.
