अनिल ठाणेकर
ठाणे : मे.बॉस कंपनी, सातपूर नाशिक येथील कंपनीतील कामगार विजय सहाणे यांची पत्नी ज्ञानेश्वरी व कन्या अनन्या या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना इंदिरानगर परिसरात झाली आहे. संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या करण्याची ही घटना अत्यंत दुःखदायक व चिंताजनक आहे. यामुळे विजय सहाने कुटुंबीयांच्या आत्महत्येचे सखोल चौकशी करून दोषीनविरुद्ध कठोर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सिटूचे पदाधिकारी डॉ. डी एल कराड यांनी केली आहे.
विजय शहाणे हे मे.बॉस कंपनीमध्ये ११ वर्षापासून काम करीत होते, त्यांना कंपनीने इतर ७०० कामगारांसह कामावरून कमी केले होते. या संदर्भात या सर्व कामगारांनी नाशिकच्या औद्योगिक न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व देशाचे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाने कामावर घेण्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम केला होता. त्यानुसार या कामगारांना कामावर घेण्यात आले. परंतु त्यांना काम दिले नाही व वेगळ्या शेडमध्ये बसून ठेवले. तसेच सुमारे २८ कामगारांना कामावर घेतल्यानंतर निलंबित केले व २३७ कामगारांची देशात इतरत्र ठिकाणी बदली करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात जाऊनही व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असूनही कंपनी दाद देत नाही. यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. याच नैराश्यामधून विजय सहाने कुटुंबियांनी आत्महत्या केली अशी सर्वांचे भावना आहे. परंतु ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला हा कामगार कुटुंबीयांचा खूनच आहे. कंपनीच्या अत्यंत निर्दयी भूमिकेमुळे ही घटना घडली आहे. कंपनी व्यवस्थापन न्याय देत नाही, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊनही व निकाल मिळूनही कंपनी दाद देत नाही असे दिसून आल्यानेच सदर कुटुंबीयांनी आत्महत्या केली आहे. या संबंध आत्महत्येची सखोल चौकशी करावी. ही आत्महत्या करण्यास परिस्थिती निर्माण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा व या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कामगार संघटना करीत आहे. सर्व कामगार संघटना व राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेकडे आत्महत्या म्हणून न पाहता गंभीरपणे विचार करावा. राज्यात आणि नाशिक शहरात कामगारांची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे, याची दखल घेऊन हस्तक्षेप करावा. असे आवाहन सिटू कामगार संघटना करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेकडे आत्महत्या म्हणून न बघता याची सखोल चौकशी करण्याचे आदेश करावेत व शहाणे कुटुंबीयांना न्याय द्यावा. तसेच कामगारांची ही परिस्थिती बदलण्यासाठी उर्वरित ७०० कामगारांना न्याय मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी सिटू संघटना करीत आहे, असेही डॉ.डी.एल.कराड, सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, हिरामण तेलोरे यांनी केली आहे.
०००००
