इस्राईल आणि हमास यांच्या युद्धातील नवा अंक आता सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या युद्धात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा उपयोग आणि दुरुपयोग यावर पुन्हा चर्चा होऊ लागली. दोन दिवसांपूर्वी लेबनॉन मध्ये एकाच वेळी हजारो पेजरचा स्फोट झाला. हा स्फोट ताजा असतानाच त्याच्या दुसऱ्या दिवशी लेबनॉनमध्येच हजारो वकिटॉकीचा स्फोट झाला. या स्फोटात हजारो हिजबुल्ला जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागला. जगभर या स्फोटाची चर्चा सुरू झाली. हा स्फोट इस्राईलची गुप्तचर संघटना मोसादने घडवून आणला असा आरोप लेबनॉनने केला असून या स्फोटाला लवकरच जशास तसे उत्तर देण्यात येईल अशी घोषणा केली. या स्फोटा नंतर संपूर्ण जगात खळबळ माजली. पेजर सारख्या छोट्या उपकरणाचा संहारक शस्त्र म्हणून वापर करता येऊ शकतो असा विचारच कोणी केला नाही. वास्तविक पेजर हे सध्या कालबाह्य झालेले उपकरण आहे. १९९० साली आलेले हे उपकरण एकमेकांशी संपर्क करण्यासाठी वापरले जात असे. अर्थात यात फोन प्रमाणे बोलता येत नाही तर या उपकरणाद्वारे फक्त एकमेकांना छोटे टेक्स्ट मेसेज पाठवता येतात. भारतात हे उपकरण १९९५ साली आले मात्र म्हणावे तसे हे उपकरण यशस्वी ठरले नाही. मोबाईल आल्यानंतर तर त्याचा वापरच संपला असे असतानाही कालबाह्य झालेले हे उपकरण हिजबुल्ला का वापरत होते असा प्रश्न पडला असे ल तर त्याचे उत्तर असे आहे की पेजर वापरकर्त्याचे लोकेशन ट्रेस करता येत नाही. केवळ मेसेज पाठवला जात असल्याने मेसेज दोघांशिवाय तीसऱ्याला दिसत नाही म्हणूनच हीजबुल्ला चे कमांडर हे उपकरण वापरत होते. हे उपरकरण सुरक्षित आहे असा त्यांचा समज होता मात्र हा समज तेंव्हा खोटा ठरला जेंव्हा लेबनॉन मध्ये एका पाठोपाठ एक स्फोट झाले. लेबनॉन मध्ये ज्या पेजरचा स्फोट झाला त्या पेजरमध्ये अल्पप्रमाणात पेइटीएन स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. या पेजरमध्ये ज्या बॅटरया वापरण्यात आल्या होत्या त्या आयात करण्यात आल्या होत्या. याच बॅटर्यांमध्ये हे स्फोटके लपवले होते असे म्हंटले जाते. या स्फोटानंतर जगभर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतातही आता तसाच प्रश्न विचारला जात आहे कारण भविष्यातील युद्ध हे अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून लढले जाणार आहे. आज जे तंत्रज्ञान वापरून इस्राईलने हा हल्ला केला तेच तंत्रज्ञान जर अतिरेक्यांच्या हातात लागले तर जगभर हाहाकार उडेल. भारतात तर अब्जावधी लोक मोबाईल वापरतात. जगात सर्वात जास्त मोबाईल भारतीय नागरिक वपरतात. आज जर पेजर, वॉकीटॉकीचा वापर बॉम्ब म्हणून केला जातो तर भविष्यात मोबाईलही बॉम्ब होऊ शकतो. भारतात जे मोबाईल वापरण्यात येतात त्याची बॅटरी ही परदेशातून आयात केलेली असते. भारतात वापरण्यात येत असलेल्या ९० टक्के मोबाईलच्या बॅटरया या चीन, तैवान आणि हाँगकाँग येथून आपण आयात करतो केवळ मोबाईल किंवा मोबाईलची बॅटरीच नाही तर दररोज पाच लक्ष इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण परदेशातून आयात करतो. भारतातील संबंधित अथॉरिटी देखील मान्य करेल की देशात आयात होणाऱ्या ९० टक्के उपकरणांची कोणतीही तपासणी होत नाही. यावरून लक्षात येईल की आपल्या देशात किती धोकेदायक परिस्थिती आहे. देशातील प्रत्येक नागरिक आपल्या खिशात एक बॉम्ब घेऊन फिरतोय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील काही दिवसात जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी पुन्हा सक्रिय झाले आहेत. काश्मीरमध्ये घुसखोरी वाढली आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गुप्तचर संस्थांच्या चौकशीतून हे निष्पन्न झाले आहे की अतिरेकी घुसखोरी करताना मोठ्या प्रमाणात मोबाईल ॲपचा वापर करत आहेत. या ॲप चा वापर गिर्यारोहक पर्वतावर, डोंगरावर चडण्यासाठी करतात आता याच ॲपचा वापर करत अतिरेकी घुसखोरी करत आहेत. चीन तर आपला १ नंबर चा शत्रू आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यात चीनचा हातखंडा आहे. उद्या लेबनॉन स्फोटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान अतिरेक्यांच्या हाताला लागले किंवा चीन सारखा देश त्याचा वापर शस्त्र म्हणून करू लागला तर तर काय होईल याचा विचारही करवत नाही म्हणूनच भारताने याबाबत दक्ष राहायला हवे.
भारतात विदेशातून येणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तसेच वस्तूंची १०० टक्के तपासणी व्हायला हवी. मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्ट वॉच यासारख्या गॅझेट वापरा संदर्भात सरकारने गाईड लाईन निश्चित करण्यात करावी. प्रत्येक नागरिकांना या बाबत प्रशिक्षण द्यावे. लेबनॉन मध्ये जे झाले ते भारतात होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच दक्ष राहून योग्य ती खबरदारी घ्यावी कारण युद्धाच्या या नव्या प्रकाराचा धोका भारताला अधिक आहे. भारताने लेबनॉन पासून धडा घ्यायला हवा.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *