मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढाव घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा मुंबई दौरा निश्चित झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसांत दिल्लीतून अधिकारी महाराष्ट्रात येत असून राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसंमवेत, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ते चर्चा करणार आहेत.
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र, मनसे व वंचित बहुजन आघाडीनेही एकलो चलोचा नारा देत काही उमेदवारांची घोषणाही केली आहे. तसेच, संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येते. तर, निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.
