मुंबई : ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१सप्टेंबरला गिरगाव येथे हास्य कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी कवी नितीन वरणकार यांच्या ‘माया कोरा रायला कागद अन् सरून गेली शाई, बुड्यानं माया लग्नाची बेज्या केल्या घाई’ या कवितेने अक्षरशः हशा पिकला, तर प्रवीण बोपुलकर यांच्या ‘व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही, कारण एकच, जुना एकही नंबर आता लागत नाही’, या गझलेचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी केले, तर कार्यक्रमाचा आढावा कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी घेतला. प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, उपाध्यक्ष डॉ. उज्वला मेहेंदळे, शब्दवेल सचिव अश्विनी अतकरे, खजिनदार देवेंद्र इंगळकर उपस्थित होते.
या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार (शेगाव-बुलढाणा), प्रा. संजय कावरे (मंगरूळपीर-वाशिम), प्रवीण सोनोने (दारव्हा-यवतमाळ), प्रा. महादेव लुले (तिवसा-अकोला), अमोल चरडे (पुणे), प्रवीण बोपुलकर (पनवेल) यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कविसंमेलनामध्ये कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार हास्यकविता सादर केल्या.
याप्रसंगी महाराष्ट्राच्या हास्य कवी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमही पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांक : श्रीराम घडे, द्वितीय क्रमांक : अजय माटे, तृतीय क्रमांक : पल्लवी चिंचोळकर यांना प्राप्त झाला. तसेच दहा उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतिभा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास गायधने, नवनाथ माने, विलास पुंडले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज वराडे यांनी, तर प्रा. प्रतिभा बिश्वास यांनी आभार मानले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *