१५० कोटींची मंजुरी
अनिल ठाणेकर/अरविंद जोशी

 

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सोवा ब्रिज ते घोडबंदर गावाशेजारी घोडबंदर किल्ल्यापर्यंत खाडी किनारा विकसित करण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या पहिल्या टप्प्यात जवळपास २ किलोमीटर इतकी लांब ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची , सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
मीरा भाईंदर शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा , ‘वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट’ केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिजाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले. वरसावे ब्रिज ते घोडबंदर गावा पर्यंत खाडी किनारा साधारण १.८ किलोमीटर इतका विकसित केला जाणार आहे. परदेशात जसे ‘वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट’ करून परिसर सुशोभित केला जातो , त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याचपद्धतीने मीरा भाईंदरचा हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकास करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचे पहिल्या टप्प्याचा खर्च १५० कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यातील १२१ कोटींचे टेंडर प्रक्रिया मीरा भाईंदर महापालिकेने पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्याने त्याठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीआरझेडची परवानगी २३ सप्टेंबर रोजी मिळाली आहे.  ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ कडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यावर पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. वर्सोवा-घोडबंदर खाडी किनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा आराखडा तयार आहे. खाडी किनारा विकास करीत असताना नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी मोठा ‘पाथ वे’ , विविध प्रकारचे आकर्षक गार्डन , विसर्जन घाट , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन , पार्किंगची सुविधा , वॉक वे , खेळण्यासाठी मोकळी जागा , ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा , लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल –  फुटबॉल खेळता येईल अशी जागा , आकर्षक लायटिंग ,सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. खाडी किनारा विकास म्हणजेच हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ आहे. या खाडी किनाऱ्यावर जिथे मँग्रोज आहेत तिथे ‘लाकडाचे’ म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य हा प्रकल्प राबविताना या  कामात वापरण्याचे प्रस्तावित केले आहे. या किनाऱ्यावर जे घाट बनवले जातील ते घाट सोडले तर नागरिकांचा पाण्याशी संपर्क येणार नाही. हे ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ खाडी किनारा विकास पूर्ण झाल्यावर फक्त मीरा भाईंदर मधील नाही तर संपूर्ण मुंबई महानगरातील हे पर्यटन केंद्र बनेल , असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सर्व वयोगटातील नागरिकांना आवडेल अशापद्धतीने येथे खाडी किनारा विकास केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हे खाडी किनारा सुशोभीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात १५० कोटींचा निधी दिल्याने हे काम सुरु होत आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो पूर्ण झाल्यावर ठाणे जिल्ह्यातच न्हवे तर संपूर्ण राज्यात हा खाडी किनारा विकास प्रकल्प सर्वाना प्रेरणादायी ठरेल , असे आमदार सरनाईक म्हणाले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *