ठाणे :जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.०१ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरू असून दि. ३१ ऑक्टोंबर, २०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे.
पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर असे वर्षातून दोन वेळा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जल जीवन मिशन अतुल पारसकर यांनी हे सर्वेक्षण वेळेत पुर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.
सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी यांच्यावर या सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. हे अत्यंत वैशिष्टपूर्ण सर्वेक्षण असून सर्वेक्षणाच्या निकषांनुसार तसेच स्त्रोतांच्या जोखीमेनुसार वर्गीकरण करून व ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरीत करण्यात आहे.
