अशोक गायकवाड
रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगानी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन, सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
विधानसभा निवडणूक २०२४ ची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची गुरुवार,(दि.०३ ऑक्टोबर २०२४) रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जस्मिन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिराजदार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, एसएसटी पथक मोठे बनवा, भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे. याचे सर्वांनी दक्षता घ्यावी. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. संशायास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वत:चे मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचा सूचनांचा अभ्यास सर्वांनी करावी, असेही ते म्हणाले. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, गोवा बनावटीच्या मद्य वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलीस विभागाला द्यावी, जेणेकरुन त्याच्या मुळाशी जाता येईल. आरोपींची सविस्तर माहिती काढता येईल. पोलीस, महसूल, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर अशा सर्वसमावेशक पथक तपासणी नाक्यावर तैनात करुन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी, कायदा व सुव्यवस्था, काय करावे, काय करु नये, याबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले.
