माथेरान : विधानसभेच्या निवडणुकांचा ज्वर आता हळूहळू जोर धरू लागला असून माथेरानमध्येही त्याचे वारे आता फिरू लागले आहे परंतु यावेळी माथेरानकर कोणाला साथ देणार हे मात्र अजूनही बोलत असतात व सर्वच उमेदवारांना आश्वासने दिली असली तरी या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना गाफील ठेवून धक्का देणार हे मात्र निश्चित आहे.

कर्जत खालापूर मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या माथेरानकरांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असून रात्रीच्या अंधारातही खलबत्ते सुरू झाली आहे.परंतु वैयक्तिक असलेले संबंध या निवडणुकीमध्ये पक्ष निष्ठेवर भारी होण्याची चिन्हे असून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माथेरानमध्ये धक्का बसू शकतो अशी दाट शक्यता आता निर्माण होऊ लागली आहे.

विधानसभेच्या निमित्ताने हळूहळू निवडणुकांच्या रंग आता भरू लागले आहेत, यानंतर सुद्धा  स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लागणार असल्याने काही काळ भूमिगत झालेले स्वयंघोषित नेते आता हळूहळू दिसू लागले आहेत त्यास माथेरान ही अपवाद नसून मागील दोन वर्षांपासून भूमिगत झालेल्या काही नेत्यांची आता दर्शने होऊ लागल्याने निवडणुका जवळ आल्या आहेत हे स्थानिकांच्या लक्षात आले आहे.

माथेरान नगरपालिकेचे सभागृह

विसर्जित होऊन आता दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते व या काळात मात्र मध्ये अनेक इच्छुकांचे मतदारांचे थेट संबंध येत होते परंतु निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यानंतर ही सर्व मंडळी गायब झाली होती त्यातील काही अपवाद वगळता स्वयंघोषित नेते भूमिगत झाले होते परंतु आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण मतदारांचे कैवारी आहोत हे दाखविण्याकरता काही जणांची धडपड सुरू झाल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.

माथेरानच्या सभ्य राजकारणामध्ये मागील तीन चार वर्षांमध्ये अनेक बदल पहावयास मिळाले, फोडाफोडीचे राजकारण, वर्चस्वाची लढाई, अंतर्गत कलह व राजकीय वैमनस्यातून हल्ला असे नवीन प्रकार माथेरानकरांना प्रथमच अनुभवायला मिळाले. फोडाफोडीच्या राजकारणामुळे अनेक पक्षांना उभारी आली तर प्रस्थापित पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावरती दिसत आहेत. माथेरानच्या राजकारणात प्रथमच असे घडले परंतु हे सर्व होत असताना कोणताही एक पक्ष सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून समोर आलेला नाही वरिष्ठ नेत्यांच्या प्रभावावर आपण सत्ता काबीज करू असे सर्वांनाच वाटत असले तरी मतदार कोणाला कौल देतील हे सांगणे कठीण आहे कारण पक्षनिष्ठा गंगेत मिळाल्याने सच्चा कार्यकर्ता दुखावला गेला आहे व यापुढे आपला वापर करून घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची हे मनाशी खूणगाठ बांधून आहे.

माथेरान मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे मागील दोन वर्षांमध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या घेऊन एकही नेता नगरपालिकेमध्ये गेलेला नाही याउलट आपणच नागरिकांचे प्रश्न सोडवतो असे भासविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे परंतु आता जनता दूध खुळी राहिलेली नसून अनेक अमिषे व प्रलोभनाला बळी पडणारा पारंपारिक मतदार हा जागा झाला असून त्याचा फटका येत्या निवडणुकीत सर्वांना पडणार आहे.

माथेरान मध्ये महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्याचा थेट पाठपुरावा करण्यास सर्वच राजकीय पक्ष अपुरे पडले आहेत, माथेरान साठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यायी रस्ता व येथील वाहन स्थळ विकसित करणे ज्याकडे या दोन वर्षांमध्ये लक्ष दिले गेले नसल्याचे दिसत आहे. स्थानिक तालुका पातळीवरील नेतृत्व व त्यांचे समर्थक मतांच्या राजकारणाकरिता काही बाहेरील लोकांचे हित जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक तर या महत्त्वाच्या विषयांना बगल देत नाहीत ना असा संशय व्यक्त केला जात आहे, सध्या भाजप पक्षांनी देशातील सर्वच निवडणुकांना प्राधान्य देताना आघाडी उघडली आहे परंतु माथेरान मधील स्थानिक भाजप कोणतीही ठोस भूमिका घेताना सध्यातरी कमी पडत असल्याचे चित्र आहे त्यांनी अनेक वेळा स्थानिकांच्या प्रश्नासाठी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती परंतु हे प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचे चित्र आहे सध्या राज्यात व देशामध्ये भाजप सरकार असल्याने माथेरानचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नेत्यांना मोठा वाव आहे परंतु आतापर्यंत एकही मोठा प्रश्न सोडवता आलेला नाही त्यामुळे त्यांना माथेरान मधील मतदारांवर अजून तरी पकड बनविण्यास यश आलेले नाही सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या कलहाचा फटका माथेरानला देखील बसला आहे राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर माथेरान मध्ये राष्ट्रवादी आहे की नाही याचे उत्तर कोणालाही मिळालेले नाही कारण स्थानिक पातळीवर अजून तरी राष्ट्रवादी कोणत्या गटामध्ये आहे हे जाहीर झालेले नाही सुरेश भाऊ लाड भाजपवासी झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून काही जणांनी सुरेश भाऊंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा ही दिल्या आहेत व सहकार्याची भूमिका दाखवली आहे त्यामुळे येथेही दोन गट असल्याचे दिसून येत आहे.

मागील काळातील सत्ताधारी शिवसेना पक्षाची फार मोठी वाताहात माथेरान मध्ये पहावयास मिळाली होती, पहिल्यांदा पक्ष फुटीमुळे कमजोर झालेला पक्ष व त्यानंतर पक्षातील बंडाचे प्रतिसाद माथेरानमध्येही पहावयास मिळाल्याने पडलेले दोन गट त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आले होते परंतु स्थानिक आमदारांनी दिलेल्या पाठिंबावर माथेरानमध्ये शिंदे गट सावरत आहे तर उद्धव ठाकरे गटाची कार्यकर्ते हळूहळू दुरावत असल्याने त्याची परिस्थिती खालावली आहे त्यामुळेच माथेरान मधील आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणताही एक पक्ष सत्तेवरती दावा बोलू शकत नाही. स्थानिक राष्ट्रीय काँग्रेस मधून एक मोठा गट शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटाला उभारी आली आहे परंतु या गटांनी उचललेल्या या पावलाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे शिंदे गटाला याचा कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल, अनेक पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दुखवला गेला आहे व या माथेरानच्या स्थानिक  राजकारणाचा फायदा कोणताही पक्ष घेईल असे सध्या तरी वाटत नाही परंतु स्थानिक नागरिकांच्या समस्यांना थेट हात घातला तर मात्र यामध्ये बदल होऊ शकतो परंतु असे कोणताही पक्ष भूमिका घेईल असे  सध्या तरी वाटत नाही कारण बदलत्या राजकारणामध्ये सर्वांना समाविष्ट करून मतदारांवर डोळा ठेवूनच पुढचे राजकारण केले जात असल्याचे चित्र सध्या तरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *