राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात पराकोटीची राजकीय तेढ असतानाही आश्चर्यकारक रित्या येथील एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नसल्याचे आज जाहिर करण्यात आले आहे. राजकीय पक्ष जास्त सुसंस्कृत झालेत की पोलिसांचा दरारा वाढलाय याबाबत समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली होती.
सिंधुदुर्गातील कणकवली,सावंतवाडी,आणि कुडाळ या तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकूण ९२१ मतदान केंद्र असून एकही केंद्र संवेदनशील नाही अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही एकही मतदान केंद्र संवेदनशील नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन आपण सर्व प्रतिनिधींना केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ४८२ पुरुष, १ लाख १६ हजार ०६१ महिला, १ तृतीयपंथी असे २ लाख २९ हजार ५४४ मतदारांची संख्या आहे. कुडाळ विधासभा मतदारसंघात १ लाख ७ हजार २०१ पुरुष, १ लाख ८ हजार २८२ महिला, असे २ लाख १५ हजार ४८३ मतदारांची संख्या आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ५६० पुरुष, १ लाख १३ हजार ४६६ महिला, असे २ लाख २७ हजार ०२६ मतदार आहेत.
तिन्ही मतदारसंघात एकूण ६ लाख ७२ हजार ०५३ मतदार आहेत.त्यामध्ये ३लाख ३४ हजार १९० पुरुष तर ३ लाख ३७ हजार ८६२ महिला मतदार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
८५ वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या ११ हजार ३६४ इतकी असून जिल्ह्यात ७ हजार ९०० इतके मतदार हे दिव्यांग आहेत. मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्र (कणकवली ३३२, कुडाळ २७९ व सावंतवाडी ३१०) असून आयोगाच्या सूचनानुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
Photo
जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील बाजूला उप निवडणूक अधिकारी शेवाळे पत्रकार परिषदेत माहीत देताना
