मुंबई : महाराष्ट्रासह देशातून परतीच्या पावसानं निरोप घेतला आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत १० दिवस मुक्काम ठोकून होता. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबरला मात्र, परतीच्या पावसाने, महाराष्ट्राबरोबर सीमावर्ती मध्यप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यातून व संपूर्ण देशातून एका दिवसात निरोप घेतला. म्हणजे परतीचा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो-ना-करतो, तोच एका दिवसात तो महाराष्ट्रातून निघूनही गेला. थोडक्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस हा केवळ एका दिवसाठीच महाराष्ट्राला स्पर्श करून गेला असेच म्हणावे लागेल.
ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील दिनांक २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यानचे पावसाचे दुसरे आवर्तन त्याच्या नियोजित तारखेऐवजी ६ दिवस अगोदर म्हणजे दिनांक १६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः खालील २४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जाणवते. विशेषतः मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ह्या 24 जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.
राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या परतीच्या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
