सिंधुदुर्गनगरी : आगामी विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात अवैधरित्या दारु आणि अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून ‘चेकपोस्ट ‘ कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. गोवा राज्याच्या सीमेवर ९ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर १ असे एकूण १० आंतरराज्य ‘ चेकपोस्ट ‘ कार्यान्वित करण्यात आले आहेत.तर जिल्हा अंतर्गत ७ ठिकाणी असे एकूण १७ ‘ चेकपोस्ट ‘ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
चेकपोस्टवर दिवसरात्र कडक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. जिल्हयामध्ये १८ स्थायी सर्वेक्षण पथके आणि १० भरारी पथके स्थापन करण्यात आलीआहेत अशी माहितीही अगरवाल यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले पोलीस निरीक्षक सचिन हु़दळेकर, उपनिरीक्षक सुरेश राठोड आदी अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी यांना निवडणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या मदतीला
‘सीआरपीएफ’ आणि ‘ एसारपीएफ ‘ च्या एकूण पाच कंपन्यांची मागणी करण्यात आली असून यापैकी दोन कंपन्या आजच जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून १५ ऑक्टोबर रोजी कणकवली येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई करून ७० लाख किमतीची दारू आणि कंटेनर असा एकूण एक कोटी दहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच फोंडाघाट ‘चेकपोस्ट ‘वर १६ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील काही जणांचे जिल्ह्यातून हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये एकूण ७८ ‘वॉन्टेड ‘ असणारे आरोपी व ९ फरारी आरोपी असून त्यांचा शोध घेऊन अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि निवडणूक कालावधीत त्रासदायक ठरणाऱ्या एकूण ७८ लोकांवर प्रचलित कायद्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे अशीही माहिती त्यांनी दिली.
