मुंबई :आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर कुष्ठरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांमधून तसेच कुष्ठरुग्णांना करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण औषधोपचारामुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर आग्रही प्रयत्न होत असले तरीही समाजामध्ये या आजारासंदर्भात असलेली भिती, गैरसमज यामुळे हा आजार आजही संपुष्टात आलेला नाही. करोना संसर्गानंतर या रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ झाली होती. मात्र करोना संपताच आरोग्य विभागाने रुग्ण शोधण्याची व्यपक मोहीम हाती घेतली. जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी सांगितले. आरोग्यसेवा( कुष्ठरोग आणि क्षयरोग) विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार २०२१-२२ मध्ये १४,५२० कुष्ठरुग्ण आढळून आले. २०२२-२३ मध्ये यात वाढ होऊन १९,८६० कुष्ठरुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या असून २०२३-२४ च्या डिसेंबरपर्यंतच्या शोध मोहीमेत २० हजार कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत. जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधण्याबरोबरच प्राथमिक अवस्थेमधील रुग्ण शोधून वेळेत उपचार केल्यामुळे कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. परिणामी नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचेही प्रमाण कमी झाले आहे. बहुतेक कुष्ठरुग्ण हे गरीब असल्यामुळे ते उपजीविकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. त्यांच्या उपचारात सातत्य राहावे यासाठी या रुग्णांचा पाठपुरावा करावा लागतो. आशा तसेच कुष्ठरुग्ण कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याचे डॉ सांगळे म्हणाले.कुष्ठरुग्णांपैकी मल्टीबॅसिलरी (एमबी) कुष्ठरुग्णांवरील उपचार हे १२ महिने केले जातात तर पॅसिबॅसिलरी रुग्णांवरील उपचार हे सहा महिने केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *