अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजितदादा गट) आणि रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या खोपट येथील मध्यवर्ती निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी, निरंजन डावखरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे निवडणुक प्रमुख ॲड. सुभाष काळे, ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, रिपाईचे भास्कर वाघमारे,संदीप लेले, सुजय पतकी, सचिन पाटील, दत्ताराम (बाळा) गवस, किरण नाकती, अमित जयस्वाल, डॉ. राजेश मढवी आदी सोबतच गोवा येथील मा.आमदार ठाणे प्रभारी दामोदर नाईक, सदानंदशेठ तानावडे हे देखील उपस्थित होते.
चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्याना संबोधित करताना, ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्तामध्ये चांगले वातावरण आहे, त्यामुळे कष्टकरी, कामगार तसेच दुर्लक्षित घटकांचे प्रश्न विधीमंडळात मांडणारे अभ्यासु नेतृत्व म्हणून परिचित असलेले जनसेवक आ. संजय केळकर हे हॅट्रिक करणार असुन पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मविआच्या काळात बंद केलेल्या २०० पेक्षा अधिक योजना आमच्या सरकारने पुन्हा सुरु केल्या. शेतकरी कष्टकरी प्रत्येकाला महायुती सरकारने न्याय दिला असुन लाडकी बहीण याजेनेतून राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे. तरीही विरोधक टिकाच करीत राहतात. तेव्हा, योजना बंद करणे हे मविआचे काम तर योजना सुरू ठेवणे हे महायुतीचे काम असल्याचा टोला चव्हाण यांनी विरोधकांना लगावला.
योजना बंद करणे मविआचे तर सुरू ठेवणे महायुतीचे काम – रविंद्र चव्हाण
महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात लाडकी बहिण योजनेसह २०० पेक्षा अधिक योजना राबवल्या. तरीही विरोधक टिका करतात. तेव्हा, योजना बंद करणे हे मविआचे काम तर, योजना सुरू ठेवणे हे महायुतीचे काम आहे. असा टोला भाजप नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी आ. केळकर यांनी, भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा प्रवास कृतकृत्य करणारा असल्याचे सांगुन स्व. रामभाऊ म्हाळगी यांचा आदर्श मानुन यापुढेही वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
