निलेश राणे, मुरजी पटेल शिंदेंच्या शिवसेनेकडून दत्तक
स्वाती घोसाळकर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेची दुसरी यादी जाहिर करताना राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीतून उमेदवारी जाहिर केली. याचवेळी भाजपाकडून दोन उमेदवार दत्तक घेत त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तिकीट दिले. यात कुडाळमधून भाजपाच्या निलेश राणे आणि अंधेरी पुर्वमधून भाजपाच्या मुरजी पटेल यांचा समावेश आहे. निलेश राणे आणि मुरजी पेटल या दोघांनी अधिकृतपणे आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला.
या दुसऱ्या यादीत एकुण २० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश होता. शिंदेंच्या सेनेची आता एकुण उमेदवारांची संख्या ६५ झाली आहे. तर
भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत एकुण १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
आज जाहिर केलेल्या दुसऱ्या यादीत रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने विरोध केल्यामुळे एनवेळी भावना गवळींचे तिकीट कापण्यात आले होते. आता तिकीट देऊन त्याची भरपाई शिंदे यांनी केली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आले होते. तसेच वरळीचे स्थानिक नेते सुनील शिंदे यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी पहिली निवडणूक तुलनेने सोपी गेली होती. मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहे.
वरळीकरांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीला उभे राहण्याची सूचना दिली आहे. आम्ही एकत्रपणे वरळी आणि वरळीकरांना न्याय देऊ. वरळीच्या विकासाचे उद्दिष्ट काही वेळातच जाहीर करू. आता वरळीची वेळ आहे, अशी प्रतिक्रीया मिलिंद देवरा यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. ते दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वाटत होती. मात्र त्याआधीच त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली.
मिलिंद देवरा यांनी २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभेतून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला होता; तर २०१४ आणि २०१९ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना केंद्रातही मंत्रिपद देण्यात आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. वरळी विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गतच येतो. त्यामुळे या मतदारसंघात देवरा यांना माननारा एक वर्ग आहे. तसेच अमराठी मतांवर त्यांची पकड आहे.
