मुख्य रस्ते साफसफाई व प्रक्रियाकृत पाण्याने धुण्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांकडून समाधान
नवी मुंबई : नाविन्यपूर्ण उपक्रमांव्दारे स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणा-या नवी मुंबई शहरातील जागरुक नागरिकांनी भारतातील सर्वात मोठा सण असणारा दिवाळी उत्सव हा ‘पर्यावरणशील, फटाकेमुक्त व प्लास्टिकमुक्त’ साजरा करण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून यादृष्टीने महानगरपालिकाही तशा प्रकारची कार्यवाही करीत आहे.
दिवाळीपूर्वी नागरिक मोठया प्रमाणात आपल्या घराची साफसफाई करत असतात. अशावेळी नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार असलेल्या वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात 92 ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर’ सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल तसेच उर्वरित कच-याची विल्हेवाट लावणे सोयीचे ठरेल असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींचे फार मोठे योगदान असून कच-याचे वर्गीकरण करण्यातून तसेच महानगरपालिकेने निश्चित केलेल्या योग्य जागी कचरापेट्यांमध्ये योग्य प्रकारे कचरा टाकण्यातून आपल्या स्वच्छताकर्मींना करावे लागणारे अतिरिक्त काम कमी करून दिलासा द्यावा असे आवाहन आहे. तसेच कोणत्याही प्रकारे उघड्यावर कचरा जाळून वायू प्रदूषण वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी असेही आवाहन करण्यात आलेले आहे.
दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांचे कॉर्नर्स व पदपथ येथील गाळ सुकून झालेली माती काळजीपूर्वक साफ करण्यात येत आहे. याकरिता मॅकेनिकल स्विपींग वाहने तसेच वॉटर स्प्रेईंग वाहने यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये अग्निशमन विभागाचेही विशेष सहकार्य मिळत आहे. पावसाळी कालावधीत पावसासोबत वाहून आलेली माती रस्त्यांच्या कडेला गाळ स्वरुपात जमा होते व पाऊस थांबल्यानंतर वाहनांच्या रहदारीमुळे हवेत उडून प्रदूषणात वाढ होते. ही बाब लक्षात घेत ही रस्त्यांच्या कडेला साचलेली माती जमा करण्यात येत असून त्यानंतर या रस्त्यांची जेटींग मशीनव्दारे पाणी मारुन सफाई करण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारे पाणी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्दीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी असून यामुळे रस्ते सफाईसोबतच पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे.
या अंतर्गत नेरुळ विभागात राजीव गांधी उड्डाणपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते से 3 बस डेपो – जय भवानी सर्कलपर्यंत रस्ते स्वच्छता व रस्ते धुणे अशा दोन्ही प्रकारे विशेष स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे अवजड वाहनांची नियमित वर्दळ असणा-या बेलापूरमधील आम्रमार्गावर उरण फाटा ते नमुंमपा मुख्यालय भागाची सखोल रस्ते सफाई करण्यात आली. यासोबतच ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे – रबाळे एमआयडीसी मार्ग, महापे शिळफाटा मार्ग, वाशी कोपरखैरणे मार्ग, घणसोली पामबीच मार्ग, पटणी मार्ग अशा मुख्य मार्गांची रस्ते साफसफाई व धुणे अशा दोन्ही प्रकारे सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येणा-या महिला व पुरुषांनी महानगरपालिकेच्या या सखोल स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली असून यामुळे धूळीचे प्रमाण कमी झाल्याचे अभिप्राय दिले आहेत.
००००
