ठाण्यातील “दिवाळी पहाट” कार्यक्रमात
ठाणे : दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय होईल, असा संदेश देत तलावपाळी येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला आणि शपथ घेतली. तलावपाळी परिसर येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
भारतीय राज्यघटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा कोणत्याही परिस्थिती वापर करेन. मतदान करून उमेदवार निवडणे माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना, परिचितांना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. कोणतीही भीती वा लालसोपोटी मतदान करणार नाही, असा संकल्प उपस्थित सर्व मतदारांनी केला.
युवा वर्गाने वेशभूषाच्या माध्यमातून “राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान.., एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान.., लोकशाहीचा करूया सन्मान.., 100 टक्के करायचं मतदान…” अशी आगळीवेगळी वेशभूषा मतदार जागृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. नवमतदार तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून मतदार जागृती केली जात होती.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपले शहर, राज्य आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन स्वीप टीमकडून मतदारांना केले जात आहे.
00000
