मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे घोषणापत्र येत्या तीन दिवसात जाहीर केले जाईल – आनंद परांजपे
अनिल ठाणेकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ या जाहिरनाम्याचे प्रकाशन व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. लाडकी बहीण योजनेची रक्कम रुपये २१०० पर्यंत वाढवणार, शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकर्या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून मतदारसंघनिहाय जाहिरनामा आणि राज्यव्यापी आश्वासने ही जाहीरनाम्याची वैशिष्टे असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसात १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघासाठीचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. यावेळी महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला हे उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने निवडणूक लढवीत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघासाठी आपला जाहिरनामा जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईत तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या रुपये १५०० वरुन प्रति महिना रुपये २१०० पर्यंत वाढवणार असल्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जे २.३ कोटी महिलांना प्रतिवर्षी रुपये २५ हजाराचा लाभ देईल. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने आहेत. ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रुपये १५०० वरुन रुपये २१०० प्रति महिना वाढविण्यात येणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रति वर्ष रुपये १२ हजारावरुन रुपये १५ हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी रुपये २५ हजार प्रति हेक्टर बोनस, एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्ध पिकांसाठी २० टक्के अतिरिक्त अनुदान, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करणार असून ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे. २.५ दशलक्ष नोकर्या, प्रशिक्षणाद्वारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांना रुपये १० हजार मासिक स्टायफंड प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे. अंगणवाडी व आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांना रुपये १५ मासिक वेतन, सौर आणि अक्षय उर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्याचे वचन. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात नवीन महाराष्ट्र व्हिजन सादर करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अंकुश ठेवण्यात येईल, असे वचन महाराष्ट्रवादी घोषणापत्रात देण्यात आले आहे.
०००००
