नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आज सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. ८ नोव्हेंबर २०२४ हा दिवस चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा कामकाजाचा दिवस होता. त्यामुळे त्यांना आज निरोप देण्यात आला.
महाराष्ट्र सत्तासंघर्ष आणि पक्ष व चिन्ह प्रकरण ही सर्व प्रकरणे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी होती. मात्र, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाही आणि वारंवार थेट टिप्पणी होऊनही कोणत्याही निर्णयाविना सरन्यायाधीश निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण नवीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू राहील. राष्ट्रवादीमधील वाद सुद्धा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता देशाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात, सरन्यायाधीश चंद्रचूड १२७४ खंडपीठांचा भाग होते. त्यांनी एकूण ६१२ निवाडे दिले. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये सर्वाधिक निकाल लिहिले आहेत. शेवटच्या दिवशीही त्यांनी ४५ खटल्यांची सुनावणी केली. चंद्रचूड यांच्या 2 वर्षांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांमध्ये कलम 370, रामजन्मभूमी मंदिर, वन रँक-वन पेन्शन, मदरसा प्रकरण, सबरीमाला मंदिर वाद, निवडणूक रोख्यांची वैधता आणि CAA-NRC सारख्या निर्णयांचा समावेश आहे.
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते सुमारे २७५ खंडपीठांचा भाग राहिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते १४ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्यामुळे नव्या सरन्यायाधीशांसमोर तरी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील वासलात लागणार का? याबाबत साशंकता आहे.
