लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये ० शेतकऱ्यांना कर्जमाफी ० वृद्धांना २१०० रुपये पेन्शन ० शेतकऱ्यांना वर्षाला १५००० रुपये ० २५ लाख रोजगारांची निर्मिती ० १० लाख विद्यार्थ्यांना वेतन
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या जनतेकरीता भाजपाने आपले संकल्प पत्र म्हणजेच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे संकल्प पत्र प्रकाशित केले. लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांवरुन महिना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी ,वृद्धांना दरमहा २१०० रुपयांचे पेन्शन, शेतकऱ्यांना सन्मान योजनेव्दारे वर्षाला १५००० रुपये तसेच २५ लाख रोजगारांची निर्मिती आणि १० लाख विद्यार्थ्यांना विद्या वेतन देण्याचा संकल्प आज भाजपाने जाहीर केला.
मुंबईत आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्रीं देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार उपस्थित होते.
आज १० नोव्हेंबरच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पराभूत केले होते, त्याच शिवशक्तिच्या प्रेरणेने काम करणारे नेते हा संकल्प पत्र सादर करत आहेत, असे सांगत भाजपकडून या पत्रकार परिषदेची सुरूवात करण्यात आली.
यावेळी संकल्प पत्र हे आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच, भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामे केली आहेत, असे सांगत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.
आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला, असे अमित शाह म्हणाले. तसेच, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द होईल, यावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण आज एनडीए सरकारने कलम ३७० रद्द करण्याचे काम केले आहे. आम्ही समृद्ध भारताचे वचन दिले होते. १० वर्षात आम्ही देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर नेली. आमचे वचन आहे की, २०२७ मध्ये आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, असे अमित शाह यांनी सांगितले.
भाजपाचे संकल्प पत्र
– लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार
– शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)
– शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
– २५ लाख रोजगारांची निर्मिती
– १० लाख विद्यार्थ्यांना वेतन
– अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.
– प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क
– वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)
– जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार
– गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौर उर्जेचा वापर करुन वीजबील ३० टक्के कमी करणार
– मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार
– महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करणार
– एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू
– अक्षय अन्न योजना
– महारथी : एआय लॅब्स
– कौशल्य जनगणना करणार
– छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र
