मुंबई : वाचन संस्कृती लोप पावली नसून वाचनाचे माध्यम बदलले आहे. दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याची ओळख होण्यास मदत होत असल्याचे मत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले.
विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ल्याच्या नेहरू नगर येथील नागरिक मंडळाच्या सभागृहात दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून प्रकाशित झालेले 110 दिवाळी अंक मांडण्यात आले असून हे अंक रसिकांना भरघोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सदामंगल प्रकाशनचे आभार मानले. विहंग प्रतिष्ठानने महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख दिवाळी अंक प्रदर्शनातून जपली आहे. जेष्ठांनी वाचनाची आवड जोपासली तर नवीन पिढी मोबाइल वाचनातून पुन्हा पुस्तक वाचनाकडे वळू शकेल. मात्र वाचन हे कायमच राहील, असा आशावाद संदीप चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
रही भिडे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाद्वारे विविध साहित्यिकांच्या दिवाळी अंकातील साहित्याची ओळख करून दिल्याबद्दल विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळा चे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग गोरे होते.
यावेळी महाराष्ट्र दिनमानचे संपादक विनोद साळवी, पत्रकार हेमंत सामंत, सदामंगलच्या संपादक प्रज्ञा जांभेकर, व्यवस्थापक प्रशांत शिंदे, विधी आयोगाचे माजी सदस्य प्रिन्सिपल डी. एन. संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्जुक्ता मोकाशी-राव यांनी केले. हे प्रदर्शन रविवार 10 नोव्हेंबर पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले असून सवलतीच्या दरात रसिकांना अंक विकत घेता येतील. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी सहा वाजता स्वरगंध वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
