सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर टीकास्त्र, सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी बदलापूरात सभा

 

बदलापूर : राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बदलापूर शहराची बदनामी झाली. मात्र, एवढी गलिच्छ घटना घडल्यानंतरही फडणवीस बदलापूरकडे फिरकले नाहीत. उलट बंदूक घेऊन बदलापूर असे बोर्ड लावले गेले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. बदनामी झालेल्या बदलापूर शहराला आगामी सहा महिन्यांत पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांची बदलापूरमधील कात्रप येथे भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार निलेश लंके, लोकनेते गोटीरामभाऊ पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ज्योती ठाकरे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड,  महेश तपासे, विद्या वेखंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप, आरपीआय सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच बदलापूर येथील महिला व नागरिकांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. बदलापूरच्या लेकीबाबत झालेले चुकीचे वर्तन हे बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यामुळेच जगाला समजले. या आंदोलनामुळे ही घटना समजली. अन्यथा या भयंकर प्रकाराची जगाला माहिती मिळाली नसती, असे नमूद करीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बदलापूर शहरात पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, अपुरी लोकल सेवा आदी अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, बदलापूरकर गर्दीत प्रवास करीत आहेत. बुलेट ट्रेनऐवजी बदलापूर ते चर्चगेटपर्यत ट्रेन लिंक करायला हवी. स्वच्छ स्वच्छतागृहे उभारायला हवीत, असे भाषणात म्हटल्यावर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला पसंती दिली.
नगरहून मुंबईला येताना माळशेज घाटात खड्डे लागल्यानंतर आम्हाला मुरबाड मतदारसंघ सुरू झाल्याचे समजते. गेल्या २० वर्षांत या भागाचा विकास झाला नाही. काचेच्या पुलाची १० वर्षांपासून घोषणा केली जात आहे, ही काय भानगड आहे. केवळ निवडणूक आली की दिशाभूल करण्याचा उद्योग केला जात आहे, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली.
बदलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. महिला लोकलसह  रेल्वे प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.
बदलापूर शहरात २० वर्षांत महाविकास आघाडीची प्रथमच भव्य सभा झाली. आतापर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. मुरबाडला गेल्यानंतर बदलापूरमध्ये विकास केला, तर बदलापूरला आल्यावर मुरबाडमध्ये विकास केल्याचे सांगितले जाते. लोकल प्रवाशांचे हाल सुरु असून, महिला लोकलची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचे हेतूपुरस्सर नियोजन झाले नसून, बगलबच्च्यांचे टँकर सुरू झाले आहेत. २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत बदलापूरच्या सुसज्ज हॉस्पिटलचे आश्वासन दिले जाते, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.
चौकट
टोपी घालून श्रेयासाठी धाव
वडोदरा एक्सप्रेस हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून, या महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी ते टोपी घालून धावले.पण रेल्वे हा विषय माझा नाही, असे म्हणतात. एखादे काम झाले की ते मी केले, तर रखडलेली कामे दाखविली की ते माझे काम नाही, अशी त्यांच्या कामाची स्टाईल आहे, असा टोला सुभाष पवार यांनी कोणाचेही नाव न घेता मारला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *