पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राहुल गांधींना चँलेंज
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीतील आपल्या शेवटच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटीबद्ध असून बहुमताने महायुतीला निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले पण त्याचसोबत मोदींनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीवरही हल्लाबोल केला. “मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र एक पक्ष मविआत आहे ज्याने काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. काँग्रेसच्या शहजादांकडून बाळासाहेबांचे गौरवोद्गार काढायला सांगा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा असे चँलेंज मोदींनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनाही दिले.
विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा मुंबईच्या शिवाजीपार्कवर पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच त्यांनी मुंबईतील विविध विकासकामांविषयी माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असणार आहे. येत्या रविवारी 17 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी मुंबईत आज मोदींची शेवटची सभा पार पडली. आज सकाळी औरंगाबाद त्यानंतर पनवेल आणि शेवटची सभा शिवाजीपार्कवर घेतली.
काँग्रेसने गरिबी हटाव नारा तर दिला मात्र स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देशातील गरीब अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सभेत केला. दरम्यान आम्ही जे १० वर्षात दिले ते काँग्रेस ७० वर्षात देऊ शकले नसल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणात मोदी यांनी दहा वर्षाच्या काळात ४ कोटी बेघरांना घरे दिली,१२ कोटी गरिबांसाठी शौचालये बांधली ,प्रत्येक घरात बँक खाते उघडले ,१२ कोटी घरात नळाचे पाणी पोहचवले तसेच ८० कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला मोफत रेशन देत असल्याचे सांगत रायगड जिल्ह्यात १८ लाख नागरिक याचा लाभ घेत असल्याचे सांगितले.
विरोधकांना लाडकी बहीण योजना बंद पडायची आहे. ही योजना बंद पाडण्यासाठी ते न्यायालयात देखील गेले. हे लोक जर का सत्तेत आले तर सर्वप्रथम ही योजना बंद पाडतील असा आरोपही मोदी यांनी केला.
