मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि आसपासच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून त्यासाठी पाच कोटीचा निधी वर्ग केला आहे.
मतदान केंद्र व आसपासच्या परिसराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, मतदान केंद्रावरील स्वच्छतागृहांची स्वच्छता आदी कामांसाठी पालिका प्रशासनाला तब्बल पाच कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सर्व मतदान केंद्र स्थळी स्वच्छता राखण्यासाठी २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेक मतदान केंद्रांवर स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती. या सुविधांअभावी मतदारांसह निवडणुकीच्या कामासाठी तैनात कर्मचाऱ्यांचेही प्रचंड हाल झाले होते. अस्वच्छतेमुळे मतदारांसह कर्माचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच स्वच्छतेच्या कामात कुठलीही हयगय होऊ नये, यासाठी पालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या २५ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाख रुपये यानुसार पाच कोटी रुपये विशेष निधी देण्यात आला आहे. मतदान केंद्र आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित विभाग कार्यालयातील घनककचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक अभियंत्यावर सोपविण्यात आली आहे. मतदान केंद्रांमध्ये प्रसाधनगृह नसल्यास तेथे फिरते प्रसाधनगृह उपलब्ध करण्याची सूचना प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
