इचलकरंजी : महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो अशी मिश्कील टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर पावसात इचलकरंजीची सभा गावजली. वयाच्या ८३ व्या वर्षी भर पावसात हजोरोंच्या सभेला शरद पवारांनी संबोधित केले. शरद पवारांची ही जिगर पाहून कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत सभा गाजवली.
साताऱ्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेतील पावसाची आठवण करून देणारी ही इचलकरंजीची सभा ठरली. इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस आणि शरद पवार असे समीकरण जुळून आले. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
पवार म्हणाले की लोकसभेत निवडणुकीनंतर आता विधानसभेचे निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असे ते म्हणाले. पवार यांनी सांगितले की ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चौकट
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री
मिळालेली पाहण्याची इच्छा !
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, “राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले असून सुप्रीया सुळे यांचे नाव त्यामुळे पुन्हा एखदा चर्चेत आले आहे. मात्र संध्याकाळी उशीरा सुप्रीया दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणात रमली असुन महाराष्ट्रात परतण्यास तीला स्वारस्य नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
