प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ‘गांधी’जींच्या दर्शनाकडे कार्यकर्त्यांचे डोळे
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षांनी दणकून प्रचार केला. सभा, प्रचार फेरी, रॅलींच्या मैदानातून गेले महीनाभर सुरु असलेली मैदानावरची लढाई आज संपली आता पुढील दोन दिवस कागदावरची लढाई सुरु होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कागदावरच्या या लढाईत निवडणूकीच्या मतदानाचे व्यवस्थापन तर आलेच पण मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी ‘गांधीं’चे दर्शन केले जाईल. गांधींची छाप असणाऱ्या नोटांचा खेळ खऱ्या अर्थाने सरु होईल. ‘कतल की रात’ असा कोर्डवर्ड सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत लोक प्रिय आहे. करोडो रुपयांची त्यासाठी उलाढाल होईल असे सुत्रांनी सांगितले आहे.
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे, मुंबादेवीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंह राजकारणातील दिग्गजांच्या सभांसह प्रचाराच्या तोफा थंडावल्याचं दिसून आलं. कुठे सभा घेण्यात आल्या. तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा गाजवल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीनेही जोरदार दणक्यात प्रचार केला.
