मुंबई :  विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरीदेखील जे जिकंले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी मविआच्या उमेदवारांना मतदान दिलं त्यांचं धन्यवाद मानतो. तसं पाहिलं तर जणूकाही लाटेपेक्षा त्सुनामी आली असं वातावरण या निकालानं दिसतंय. हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही असा प्रश्न आहे. जे आकडे दिसत आहेत, ते पाहिल्यानंतर सरकारला एखादं बिल मंजुरीसाठी विधानभवनात मांडण्याची गरज नाही असं दिसतंय. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा काही दिवसांपूर्वी बोलले होते एकच पक्ष राहील. वन नेशन वन इलेक्शन, वन पार्टी या दिशेनं आगेकूच चालली काय  असं चित्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात म्हणून दिली का? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही. या मागचं गुपित शोधावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कुणीच काही बोलण्याची गरज नाही. निकाल मान्य नसेल तर प्राणपणानं लढत राहू. महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो आम्ही तुमच्या सोबत राहू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लाडकी बहीण इफेक्ट असेल तर सोयबीनच्या भावाचा प्रश्न आहे, बेकारी वाढतेय, अनेक गोष्टी आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळेला तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा, अपेक्षा आहे.  महाविकास आघाडीचं काय चुकलं असं म्हणत असाल तर आम्ही फार प्रामाणिकपणानं वागलो, हे चुकलं की काय असं वाटतंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *