भिवंडी : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीलादेखील बसतो. ही जाळपोळ थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी शहर व परिसरात अनेक भंगार गोदामे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यांच्याकडे या व्यवसायासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाही. अवैध भंगार गोदामांमुळे दोन दिवसांपूर्वी शहरातील फातमा नगर परिसरात आगीची मोठी घटना घडली होती. शहर आणि परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर अंकुश आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भंगार गोदामास लागून असलेल्या लोकवस्तीमधून होऊ लागली आहे.
