ठाणे : रेल्वे स्थानक परिसरात गटई चर्मकार समाज कामगार संघटना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, पुढील वर्षभर ठाणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये संविधान गौरव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमास पीआरपीच्या महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई अलिंग, शंकर जमदाडे, कलिराम मंडराई, सुभाष अहिरे, दत्ता चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, मनिषा चव्हाण, योगेश गुजर, सुखराम चव्हाण आदी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात राजाभाऊ चव्हाण यांच्या पुढाकाराने संविधान दिनानिमित्त संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आ. संजय केळकर, ठामपा उपायुक्त शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त भाईत, हे उपस्थित होते. या तिघांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे जाहीर वाचन करून संविधान रक्षणाची शपथ राजाभाऊ चव्हाण यांनी उपस्थितांना दिली. या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, आपणाला व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामागेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिश्रम आहेत. त्यांच्यामुळेच आपण लोकशाहीत जगत आहोत. संविधानाने आपले रक्षण केले आहे. आता संविधानाचे रक्षण आपणही केले पाहिजे. त्यासाठीच आपण सबंध ठाणे शहरात संविधान गौरव अभियान राबविणार आहोत. प्रत्येक वस्तीत जाऊन तेथील सामाजिक सभागृह, बुद्धविहार किंवा चौकाचौकात संविधानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व्याख्याने आणि माहितीप्रधान कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत, असे जाहीर केले.
