अनिल ठाणेकर
ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्‍या प्रकांड पंडिताचा ६ डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन. शोषित-वंचितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. बाबसाहेबांच्या निधनाची वार्ता देशासह जगभरात वाऱ्यासारखी पसरली होती. ही वार्ता ऐकून देशातील प्रत्येक नागरिकांना हंबरडा फुटला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव मुंबईत आल्यानंतर मुंबईत प्रचंड गर्दी झाली. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला असंख्य लोकं जमली. अक्षरशः मुंबई थांबली होती. बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता. २५ कापड गिरण्या पूर्णपणे बंद, तर ५ गिरण्या अंशत: चालू होत्या. परळ, माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या गोदीतील सुमारे २५ हजार कामगार आले होते, अशी आठवण डॉ.जितेंद्र आव्हाड करुन देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी फक्त आचार्य अत्रे यांचे भाषण झाले. आचार्य अत्रे या भाषणात म्हणतात,असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही’ आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मराणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत..? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर, एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली..? “महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. आकाशातील देवांनाही हेवा वाटावा, असे भाग्य त्यांना लाभले. भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही. परंतु असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही.“झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड. असा बंडखोर, शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत..! भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हा तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. अशी शब्दुसमनांची आदरांजलीआमदारडॉ.जितेंद्रआव्हाडयांनी वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *