रमेश औताडे
मुंबई : देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफ़वा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात करून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मंगळवारी, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते.
आता राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही. पूर्वी नैतिक राजकारण केले जात असे. राजकारणात विरोधकांचा ही सन्मान केला जायचा. आता होते तशी एकमेकांवर चिखलफेक होत नव्हती.टीकेला उत्तर देताना नैतिकतेची मर्यादा सांभाळली जात होती.आमच्या कडे खूप शिव्यांचा साठा आहे पण आम्ही राजकारणात संयम ठेऊन विरोधकांना उत्तर देतो.अलीकडे मात्र एकमेकांना शिव्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. संयम मनाचा मोठेपणा ठेऊन विरोधकांचा ही आदर राखण्याची नैतिकता आता राजकारणात दिसत नाही अशी खंत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार तसेच सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते.
संविधान बदलण्यासाठीच भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे, या विरोधकांच्या आरोपावर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून निवडणूकीत मते मिळविण्यासाठी अफ़वा पसरविल्या जात आहेत. परंतु आता अफवा पसरवून आणि समाजात फूट पाडून मते मिळविण्याचे काँग्रेसचे दिवस गेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून संविधानाचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे, येत्या दिड वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण होईल. बाबासाहेबांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या दृष्टीने सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांकडून मात्र राजकीय हेतूने मोदी सरकारवर खोटे आरोप केले जात असल्याचे आठवले म्हणाले. तसेच यावेळी देशात पुन्हा सत्ता मिळवत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांमुळेच आरपीआय, शिवसेना भाजप युतीसोबत – आठवले
२०१२ साली बांद्रा येथे रहायला गेलो तेंव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांना शेजारी नात्याने भेटायला गेलो होतो. तेंव्हा बाळासाहेबांनी आपल्याशी दिड तास चर्चा करत शिवशक्ती -भीमशक्ती एकत्र येण्याची मला साध घातली होती. तेंव्हा विचारधारा वेगळी असली तरी काही किमानसमान कार्यक्रमाचे मुद्दे ठरवून आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेना-भाजप युती सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आरपीआय जेंव्हा शिवसेना-भाजप युती सोबत आली. तेंव्हा पासून युतीची महायुती झाली असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.
मी महायुती सोबत प्रामाणिक -आठवले
महायुतीच्या जागावाटपात आरपीआय पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीत त्यामुळे आरपीआय सध्या बॅकफूटवर गेली आहे. मागून आलेला राष्ट्रवादी सारखा पक्ष जागावाटपात पुढे गेला. मझ्या सारख्या राष्ट्रीय नेत्याला एक लोकसभेची जागा दिली जात नाही हा माझ्या वर अन्याय आहे .
परंतु नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण चार पाऊले मागे घेत राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महायुती अडचणीत असल्याने या कठीण काळात आपण महायुतीसोबत प्रामाणिक राहणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
वेगळा ओबीसी प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे- आठवले
मंडल आयोगाच्या शिफारशी प्रमाणे मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्व प्रथम आरपीआयने केली होती असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला. तसेच तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी वर्गाचे सध्याचे २७ टक्के आरक्षण कायम ठेवून दुसरा ओबीसी प्रवर्ग तयार करून त्यात मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे आठवले म्हणाले.
