कॉंग्रेसचे नेते प्रकाश मुथा भाजपात दाखल
कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळविण्याचा निश्चय केला आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने घराघरांमध्ये पोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माया कटारिया, उपेक्षा भोईर, वैशाली पाटील, कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसच्या इंटकचे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश चिटणीस प्रकाश मुथा यांनी कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला.
कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीतील सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरापर्यंत पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत आणि राज्यातील महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाची माहिती द्यावी, असे आवाहन करून दोन लाख मते मिळविण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
देशातील १४० जनतेला शांत झोप लागावी. गरीबांचे कल्याण व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन नागरिकांना करावे. महाविकास आघाडीच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे ते म्हणाले.
कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल, असा हा भव्य मेळावा आहे. महायुतीची ताकद पाहून विरोधकांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मनसेची एक लाख मतांची ताकद आपल्यासोबत आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही मोठा समर्थक वर्ग आहे. रिपब्लिकन पक्ष, रासप आदींच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रचता येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. कल्याण शहरात केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीच दिली, अशी टीका कपिल पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा कल्याण पश्चिममधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने महायुतीच्या विजयासाठी झटावे, असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केले. तर कल्याण-मुरबाड रेल्वे धावणार, ही समस्त मुरबाडवासियांच्या अभिमानाची बाब असून, महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
