मुंबईत  दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा बुधवार कमालीचा वैतागाचा ठरला. ऊन्हाचा पारा 42 पार झाल्याने अंगाची काहीली होत असतानाच एन दुपारी बत्तीगुल झाल्याने ठाणेककरांचे अक्षरशा हाल झाले. कळवा येथे महावितरणकडून ठाणे शहरात केला जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहरातील ४० टक्के भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
 दरम्यान, मुंबईतही गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद आज झाली. उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद  झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम  मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात  ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.
राज्यात सर्वाधिक तापमान (४२.४) जळगाव येथे नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे-बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल मात्र त्याची तीव्रता कमी असेल. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसानंतर तापमानात आणखी २ ते ३ अंशानी घट जाणवू शकेल असेही स्पष्ट केले आहे.  दरम्यान, बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महावितरणच्या कळवा येथून ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना विद्युत पुरवठा केला जातो. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, जुने ठाणे, वागळे इस्टेट परिसराचा काही भाग, कोलशेत येथील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्या विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. नोकरदार, व्यवसायिकांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे.
Chokat lead 1
राज्यात उष्माघाताचा कहर
मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळ्यामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.राज्यातील दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये मागील तीन दिवसात आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *