ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महायुतीचे आठ जागांवरील बोलणी अजून व्हायची आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत, ३० डिसेंबर अखेरचा दिवस आहे. युतीमुळे जागावाटपानंतर होणारी बंडखोरी टाळावी यासाठी भाजपा आणि शिंदेंची शिवसेना या दोघांकडूनही सावधगिरी बाळगली जात आहे. शुक्रवारी रात्री भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सेनेला अल्टीमेटम देत इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेची – भाजप प्रदेशाध्यक्षासमवेत शुक्रवारी रात्री तिसरी बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात चार तास झालेल्या बैठकीत ठाण्यातील १३१ जागांपैकी १२३ जागांवर एकमत झाल्याची बातमी आहे. या आठ जागांवर भाजपाने दावा सांगितल्यामुळे तिढा सुटलेला नाही. या आठ जागात वागळे इस्टेट लुईसवाडीतील एक जागा, शिवाईनगर येथील एक जागा, पाचपाखाडी आणि ओवळयात प्रत्येकी एक तर बाळकुम व कळवा प्रभागात प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे खासदार नरेश म्हस्के यांच्या रिक्त झालेल्या आनंदनगर प्रभागाची जागा त्यांचे चिरंजीव आशुतोष म्हस्के यांना देण्याचा घाट घातल्याने येथील इच्छुकांनी घराणेशाही विरोधात दंड थोपटले आहेत. तर काही इच्छुकांनी बंडाचा इशारा दिला आहे.
यापुर्वी २०१७ साली झालेल्या निवडणूकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकत्रित शिवसेनेने १३१ पैकी ६७ जागा जिंकत स्वबळावर ठाण्यात सत्ता आणली होती. भाजपाने २३ तर जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ३४ जागा जिंकल्या होत्या
