बित्तंबातमी इम्पॅक्ट : पालघर पोषण आहार

भ्रष्ट्राचाराची जिल्हा परिषदेने घेतली दखल

स्लग- शिक्षकासह विस्तार अधिकाऱ्यांना नोटीस ० तात्काळ अहवाल सादर करण्याचे गटशिक्षण अधिकाऱ्याला आदेश० शाळेत पोषण आहाराएवेजी थेट तांदाळाचे केले होते वाटप

योगेश चांदेकर

पालघरः विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार शिजवून देणे बंधनकारक असतानाही तसे न करता कोरडा तांदूळ त्यांना देणे नियमबाह्य आहे. असे असताना वडकून दांडीपाडा शाळेचे मुख्य शिक्षक बाबूराव शेलार यांनी मात्र विद्यार्थ्यांना तांदूळ वाटून टाकला. शालेय व्यवस्थापन समितीची पूर्वमान्यता तसेच वरिष्ठांना न कळविता तांदूळ वाटल्याच्या या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे. जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी याप्रकरणी तातडीने अहवाल मागितला आहे. या प्रकरणात शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी ‘बित्तंबातमी’ने आवाज उठवल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली आहे. दै. बित्तंबातमीकडे या नोटीशीची प्रत आहे.

विस्तार अधिकारी राजुदास जाधव यांनी चौकशी अहवालात संबंधित शिक्षकाला पाठीशी घालून चुकीचा अहवाल दिल्याने त्यांनाही आता नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्राथमिक विभागाच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर गटशिक्षणाधिकारी संजय वाघ  यांनी आता या प्रकरणात लक्ष घातले आहे.

वडकून दांडीपाडा शाळेचे प्रमुख शिक्षक बाबूराव शेलार यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप असून जिल्हा परिषद काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार शिजवून द्यायचा नियम असताना तो नियम धाब्यावर बसवून शेलार यांनी नोव्हेंम्बरमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ परस्पर वाटून टाकला. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विस्तार अधिकारी राजूदास जाधव यांनी संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांनी या वेळी तांदूळ वाटप केल्याचे मान्य करून अन्य गंभीर तक्रारी केल्या.

वास्तविक शाळेला भेट देण्यापूर्वी विस्तार अधिकारी जाधव व प्रभारी केंद्रप्रमुख जयवंत नामकोडा यांनी वरिष्ठांना कळविणे अपेक्षित होते; परंतु तसे न करता ते परस्पर शाळेवर गेले आणि त्यांनी चौकशी केली. त्या वेळी काही पत्रकारही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कॅमेरासमोर अनेक गंभीर बाबी मांडल्या; परंतु जाधव यांनी अहवाल देताना मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना परस्पर वाटपाची परवानगी कोणालाच नसते. तो आहार शिजवूनच देणे आवश्यक आहे. असे असताना शेलार यांनी मात्र विद्यार्थ्यांना परस्पर प्रत्येकी तीन ते चार किलो तांदूळ वाटून टाकला. विद्यार्थी आणि पालकही तांदूळ दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देत असताना जाधव यांची भूमिका मात्र सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात होती.

कागदोपत्री तांदूळ कमी असला, तरी प्रत्यक्षात तांदूळ जास्त असल्याचे जाधव यांनी सांगितले होते. एकीकडे तांदूळ साठ्याची चौकशी करीत असताना दुसरीकडे मात्र तांदूळ वाटपाची तक्रार आपल्याकडे आलीच नव्हती, असे परस्पर विसंगत विधान राजुदास जाधव यांनी केले होते. या प्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ वाटपाची पूर्वपरवानगी शालेय व्यवस्थापन समिती किंवा पंचायत समितीकडून न घेता तो परस्पर दिल्यामुळे त्यावर गंभीर चर्चा उपस्थित झाली. ‘बित्तंबातमी’ ने यावर आवाज उठवल्यानंतर जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. जाधव यांनी खोटा अहवाल दिल्यामुळे त्यांनाही आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

जाधव यांच्या समोर शाळेत घडलेल्या घटनांची माहिती वरिष्ठांना दिली नाही. या सर्व बाबींचा विचार करून व विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेऊन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिक्षकांच्या चुका असताना त्यांना पाठीशी घालणे ही गंभीर बाब आहे. जाधव यांनी कर्तव्यात कसूर करून कार्यालयाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई का करू नये, असे गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही याची आता दखल घेतली असून शेलार, जाधव यांच्यावर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *