शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला रोखलं
स्नानाच्या ठिकाणी पोलिसांनी पालखी रोखल्याने वाद चिघळला
शंकराचार्यांच्या शिष्यांना शेंडीला पकडून मारहाण
शंकराचार्यांचे उपोषण
प्रयागराज : प्रयागराज माघ मेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी स्नानाच्या ठिकाणाहून आधी पोलिसांनी रोखल्याने वाद चिघळला आहे. पोलिसांनी शंकराचार्यांना संगमाकडे पायी जाण्यास सांगितले. शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यास नकार देत पालखी घेऊन पुढे जाऊ लागले. यामुळे शिष्य आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अनेक शिष्यांना ताब्यात घेतले. त्यातील एका भिक्षूला पोलिस स्टेशनमध्ये शेंडीला पकडून मारहाण झाल्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्यामुळे तणाव वाढला आहे. यामुळे शंकराचार्य संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना सोडण्याचा आग्रह धरला. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना विनंती केली, पण त्यांनी नकार दिला.
शंकराचार्यांची पालखी संगमापासून एक किमी दूर ओढण्यात आली. यादरम्यान, पालखीचा क्षात्रपही तुटला, ज्यामुळे शंकराचार्य स्नान करू शकले नाहीत. वादाच्या सुरुवातीलाच, पोलिसांनी गर्दी पाहून शंकराचार्य यांना रथावरून उतरून चालण्यास सांगितले होते, परंतु शिष्यांनी नकार दिला आणि पुढे जात राहिले. यामुळे वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.
शंकराचार्यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेश सरकारचे गृहसचिव मोहित गुप्ता आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिष्यांना धक्काबुक्की केली तसेच मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यांना त्रास देण्यासाठी वरून आदेश आले असतील. सरकारच्या इशाऱ्यावर हे घडत आहे कारण ते आमच्यावर रागावले आहेत. जेव्हा महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी त्यांना जबाबदार धरले. आता ते अधिकाऱ्यांना बदला घेण्यास सांगत असतील असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पोलिसांसोबतच्या झटापटीत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांच्या रथाचे छात्रपही तुटले.
