कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन
कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने “कल्याणचा राजा” श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक भक्तिभावात व जल्लोषात रविवारी संपन्न झाली. ढोल-ताशांच्या निनादात, हरिनामाच्या पवित्र गजरात विघ्नहर्त्याचे मंगलमय आगमन झाले. भक्तांच्या अपार श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. या सोहळ्याला  आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनिषा गायकवाड, तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याणची अस्मिता आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या “श्री तिसाई प्रतिष्ठाण” आयोजित “कल्याणचा राजा” – माघी गणेशोत्सवांचे यंदाचे वर्ष हे उत्सवाचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे आहे. या वर्षापासून बाप्पाच्या “पारंपारिक आगमन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पुनालिंक रोड ते आई तिसाई देवी मंदिर, तिसगाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या माघी गणेशोत्सवाचे  विशेष आकर्षण पर्यावरणपूरक मूर्ती असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम अशी माघी गणेशोत्सवातील “टिशू पेपर” पासून (कागदी) बनवलेली भव्य श्री गणेश मूर्ती आहे. तसेच ६१ फूट उंच केदारनाथ मंदिराची नेत्रदीपक प्रतिकृती देखील याठिकाणी साकारण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *