राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून
नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण
नवी मुंबई : भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक शपथ २३ जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ग्रहण केली.
नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी सुव्यवस्थित रितीने पार पडलेली आहे व ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदविलेला आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश १०० कोटी मतदार नोंदणीकडे वाटचाल करत असून यावर्षीच्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची ‘My India, My Vote’ ही संकल्पना घोषित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने देशातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, सहा.आयुक्त अरुण पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ – अशा आशयाची सामुहिक शपथ उपस्थितांनी ग्रहण केली.
