जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात
धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले
कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास
योगेश चांदेकर
पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले.
धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात.
फिजिओथेरपीने उपचार
दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता.
सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष
या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते.
मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी
डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते.
धवल प्राणीप्रेमी
धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *