दादा : परफेक्शनचा आग्रह, स्पष्टतेचा ध्यास आणि माणुसकीचा स्पर्श

आज सकाळी उठलो आणि कळलं की दादा आपल्यात नाहीत… क्षणभर विश्वासच बसला नाही. हे खरं आहे की नाही, याची खात्री करून घ्यावीशी वाटत होती. मन सुन्न झालं होतं. शब्द सुचत नव्हते. अनेक आठवणी एकामागोमाग एक डोळ्यांसमोर येत होत्या.
दादांशी माझी पहिली भेट २००५ साली झाली. सुरतच्या इंडोर स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत होता. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती. स्टेजच्या तयारीवरून आमच्यात जोरदार वाद झाला. खूपच भांडलो, एवढं की आज आठवलं तरी हसू येतं. त्या वेळी मला समजलं नव्हतं, पण नंतर जाणवलं—दादा हे परफेक्शनिस्ट होते. प्रत्येक कामात त्यांना परिपूर्णता हवी असायची.
त्या रात्री माननीय शरद पवार साहेबांनी आम्हा दोघांना बोलावून घेतलं. दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि सांगितलं, “उद्या सकाळी सहा वाजता साईटवर जा. काम पाहा. गरज असेल तर दुरुस्ती करा.”
सकाळी स्टेडियममध्ये सगळ्या लाईट्स सुरू झाल्या आणि दादांचा चेहरा खुलला. त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं, “तू बरोबर होतास.”
त्या क्षणापासून आमची ‘डिसअ‍ॅग्रीमेंट टू अ‍ॅग्रीमेंट’ची मैत्री सुरू झाली.
दादा हे राजकारणी कमी आणि स्टेट्समन अधिक होते. मनात जे असेल ते थेट बोलायचे. गोडगोड बोलणं, आडपडदा ठेवणं त्यांना कधीच जमलं नाही. कदाचित म्हणूनच मीडिया त्यांना आवडायचं आणि मीडियालाही दादा आवडायचे. कुठलाही प्रश्न विचारला, तर फटाफट, थेट उत्तर—तेही कधी स्वतःच्या विरोधात जाईल असं असलं तरी.
मी स्वतः लेखक असल्याने दादांच्या व्यक्तिमत्त्वाकडे नेहमी बारकाईने पाहत आलो. वरून टफ वाटणारे दादा आतून अतिशय मृदू, संवेदनशील आणि माणुसकीने भरलेले होते. त्यांचा ह्युमन अँगल खूप मोठा होता. जवळून ओळखल्यानंतरच तो समजायचा.
मंत्रालयात दादांकडे नेहमीच गर्दी असायची. कारण लोकांना माहीत असायचं—दादा ‘हो’ म्हणाले तर काम नक्की होणार. ‘नाही’ असेल तर तेही स्पष्ट सांगायचे. कुठलीही फसवी आशा देत नसत.
खेळ क्षेत्राबाबत दादांची आपुलकी विशेष होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंना ते आवर्जून भेटायचे. “अडचण काय आहे?” हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा आणि तो प्रश्न लगेच सोडवण्याचा प्रयत्न ते करायचे—पैसा असो, आरोग्य असो किंवा संधीचा प्रश्न.
आज दादा आपल्यात नाहीत, ही कल्पनाच सहन होत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं व्हॅक्युम निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी तर एक आधारस्तंभच कोसळला आहे. ही पोकळी कधी आणि कशी भरून निघेल, याची कल्पनाही करता येत नाही.
दादा,
यू कॅन नॉट बी फॉरगॉटन.
तुमचे विचार, तुमचं काम आणि असंख्य आठवणी आमच्यासाठी रोडमॅप ठरणार आहेत.
तुम्ही आमच्यात सदैव जिवंत राहाल.
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि तुमच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
(लेखक हे राष्ट्रवादी पक्षाचे माजी राष्ट्रीय मीडिया संयोजक आहेत.)

प्रासंगिक

राजू रावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *